सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जालना येथील कलश सिड्स प्रा. लि. कंपनीने कोरेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे कांदा बियाणाची विक्री करून शेतकऱ्यांची १ कोटी ३४ लाख लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन चार वर्षापासून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागांत कांदा उत्पादन घेण्यात वाढ झाली आहे. आर्थिक फायदा व चांगला दर मिळू लागल्याने कांदा लागवड क्षेत्रातही अधिक वाढ होत चालली आहे. यामुळे या भागात शेतकऱ्यांच्या मार्फत अनेक कंपन्या कांदा बियाणे विकायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. मात्र गत वर्षी कांदा बियाणेमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून महागाईचे बियाणे घेऊन सुध्दा कांदे रोप उगवलेच नाहीत. या निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्यामुळे भागांतील पन्नास टक्के शेतकऱ्यांचे बियाणेमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. कंपन्याच्या फसवणूकीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या घटनेमुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्याचा गैर कारभाराचा नमुना समोर आला आहे.
गत वर्षी जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधी मध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यातील नऊ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मे.कलश सिड्स प्रा.लि.जालना व कंपनीतील संलग्न इसम आणि नायगांव ता.कोरेगाव येथील संभाजी शिवाजी भोईटे यांनी १ कोटी ६४ लाख रुपये किंमतीचे ११ हजार १५७ किलो वजन असणारे कांदा बियाणे उपलब्ध करुन दिले होते. यामध्ये वरील कालावधीमध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यातील तळीये, देऊर, वाघोली, अनपटवाडी आणि नायगांव येथील नऊ गावांतील शेतकऱ्यांचा खरेदी करण्यामध्ये समावेश आहे. मात्र उपलब्ध करुन दिलेले निकृष्ट दर्जाचे कांदा बियाणात प्रचंड नुकसान झाले होते.
या अनधिकृतपणे विक्री केलेले बियाणामुळे व स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी कंपनीच्या अज्ञात इसमाने व नायगांवच्या शेतकरी व्यापाऱ्याने फसवणूक केल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी कंपनी,अज्ञात इसम व संबधित शेतकरी या सर्वांच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या सर्वांच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.
You must be logged in to post a comment.