भाजपचा वारू शरद पवारच रोखू शकतात : आ.जयंत पाटील 

मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदेंचा विजय निश्चित

पुसेगाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा):भाजपला देशातील लोकशाही मोडून हुकूमशाही आणायची आहे. त्यांना संविधान आणि घटना बदलायची आहे. जनतेला त्यांचा हा डाव समजला असल्याने चारशे पार वल्गना करणारे आता दोनशेपर्यंत ही पोहचणार नाहीत. शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा असून राज्यात भाजपचा वारू शरद पवारच रोखू शकतात, हे माहीत झाल्याने मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. त्यांना जळी स्थळी पवारच दिसू लागले आहेत.सातारा मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पुसेगाव येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.या सभेस माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते,हणमंत चवरे,प्रताप जाधव, सचिन मोहिते,अभिनेते किरण माने, विजयराव कणसे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि पुसेगाव आणि खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

जिहे -कटापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी

जयंत पाटील म्हणाले, मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली आहे. औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यात संताजी, धनाजी दिसत होते.तसे मोदींना पवार दिसत आहेत. शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा आहेत. निकालानंतर ते सिद्ध होईलच.मोदी पवारांवर जेवढी टिका करतील तेवढ्या प्रमाणात जनता पवारांच्या पाठीशी उभी रहात आहे.भाजपच्या सुडाच्या राजकारणामुळे पवार साहेबांना जनतेची सहानुभूती मिळाली आहे.भाजपच्या काळात देश कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. सर्वत्र महागाई बेरोजगारी वाढली आहे. मी जलसंपदा मंत्री असताना शशिकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे जिहे -कटापूर योजनेला २५० कोटी रूपयेचा निधी मिळाला. मेडिकल कॉलेजसाठी जलसंपदा विभागाची जागा वैद्यकीय विभागाला देण्याचा निर्णय ही आम्हीच घेतला. परंतु आता मेडिकल कॉलेजला खंडणीचे ग्रहण लागले असल्याची चर्चा सुरू आहे. आम्ही येथील लोकभावनेचा विचार करून कोट्यवधी रूपयांची विकास कामे मार्गी लावली.

मेडिकल कॉलेजच्या मंजुरीवर माझी सही…

राजेश टोपे म्हणाले, मोदी गॅरंटी फसवी आहे. भाजपचे सर्वत्र जुमले सुरू आहेत. देशात अराजकता माजली आहे. सातारा जिल्ह्याने देशाला यशवंत विचार , पुरोगामित्व, समतेचा विचार आणि निती मूल्यांचे राजकारण दिले आहे. सध्या सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे “मान गादीला पण मत तुतारीला” देण्यासाठी जनता सरसावली आहे निष्ठावान विरुद्ध गद्दार तसेच नैतिक विरूद्ध अनैतिक मूल्यांच्या विरोधात ही निवडणूक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यात तुतारीच वाजली पाहिजे.कोरेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा बदला घ्या.असे सांगून ते म्हणाले सातारा मेडिकल कॉलेजच्या मंजुरी पत्रावर आरोग्य मंत्री म्हणून माझी सही आहे.तर जयंत पाटील यांनी मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न सोडविला आहे. या सर्व कामांसाठी शशिकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.असेही टोपे यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले, इथल्या जनतेने सासुरवास भोगला आहे. त्याचा वाचपा या निवडणुकीत निघणार आहे. माझे ॲफेडेव्हीट घेऊन काही कपटी लोक फिरत आहेत. पायगुण अपशकुनी असलेले जनतेला धमक्या देत पाणी देणार नसल्याची भाषा बोलत आहेत.लोकांना भेटणारा, निर्भिडपणे त्यांच्या पर्यंत जाता यावे असा खासदार लोकांना हवा आहे. पण विरोधकांना हे पचनी पडत नसून सत्तेच्या माजातून चुकीच्या माणसांना साथ देत आहेत. लोकांना धमक्या देणे चालू आहे. सत्ता व सुडाच्या राजकारणातून जाणीवपूर्वक मला अडकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. किती केसेस टाकायच्या तेवढ्या टाका सत्य मरणार नाही. मी प्रामाणिक असल्यामुळे निष्ठावंत राहीलो.

यावेळी प्रा.यशवंत गोसावी, अजित चिखलीकर, डॉ. सुरेश जाधव, छाया शिंदे,सागर साळुंखे यांची भाषणे झाली. पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्योती नाना सावंत यांनी स्वागत केले. सागर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. संदीप जाधव यांनी आभार मानले.

ही निवडणूक जनतेने हातात घेतलीय

सत्ता असल्याने त्या जोरावर ऐन निवडणुकीत मला अडकविण्याचा डाव सुरू आहे. परंतु जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असून सत्तेची मस्ती आलेले मतदारांना पाणी देणार नसल्याच्या धमक्या देत आहेत.द्वेष व सुडाचे राजकारण करणाऱ्यांना मतदार ब्राझीलला पाठवणार आहेत. निवडणुकीत माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर किती आणि कोणते आरोप आहेत हे सांगायला मला भाग पाडू नका.एम.आय.डी.सी त उद्योगपती का येत नाहीत, खंडणीसाठी मेडिकल कॉलेजचे काम कोण बंद पाडत आहे. लोकसभा,राज्यसभेत त्यांनी किती उपस्थिती दाखविली. किती सहभागी झाले, बोलले, जिल्ह्यातील विकासकामांचे किती प्रश्न मांडले?,दहशतवाद, गुंडगिरी कोण करते.हे जनतेला माहीत आहे.जनतेच्या भल्यासाठी मी निष्ठेने उभा आहे. ही तत्त्वांची लढाई जनतेने हाती घेतल्याने भाजपचा माज या निवडणुकीत उतरणार आहे. असेही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!