नगराध्यक्षा हरवल्यात का, त्यांचे अपहरण झालय? : मोने यांचा सवाल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सर्वसामान्य घरातील महिला असा गाजावाजा करून सातारकरांना भुलवून एका सामान्य महिलेला नगराध्यक्ष केलं. पण, त्यांना केवळ कळसूत्री बाहुली म्हणून खुर्चीवर बसवण्यात आलं. निवडणूक जवळ आल्यानं सत्ताधाऱ्यांनी विविध विकसकामांचे नारळ फोडले पण, त्यात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम काही दिसल्या नाहीत. त्या हरवल्या आहेत का त्यांचं अपहरण झालंय? असा गहन प्रश्न सातारकरांना पडला असून नगराध्यक्षांचा शोध लावणाऱ्याला संपूर्ण पोशाख करू, अशी घोषणा सातारा पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारकरांना भूलथापा मारून आणि फसवून पालिकेची सत्ता काबीज केलेल्यांनी गेल्या पाच वर्षात पालिका अक्षरशः धुवून काढली. टक्केवारी, कमिशन आणि टेंडरसाठी एकमेकांचे गळे धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षात सातारकरांसाठी काहीही केलं गेलं नाही. नगराध्यक्षा तर केवळ नामधारी बनून राहिल्या. त्यांनी काही करायचं म्हटलं तरी त्यांच्यातलाच दुसरा गट त्यांचे हात बांधून टाकायचा. काही दिवसांपासून तर नगराध्यक्षा गायब असल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत शहरात अनेक ठिकाणी नारळ फुटले. विकासकामांचे का, रस्ता आणि चौकाच्या नावाचे नारळ फुटले हे सातारकरांना काही समजले नाही. अशा या अनोख्या आणि महत्वाच्या कार्यक्रमात सुद्धा नगराध्यक्षा उपस्थित नव्हत्या, याचे आश्चर्य आहे. महत्वाच्या कार्यक्रमात सुद्धा नगराध्यक्षा दिसत नसल्याने त्या हरवल्या आहेत का, त्यांचे अपहरण झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांच्यासारख कदम यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं कि काय? अशी शंकाही निर्माण झाली आहे. कार्यकाल संपत आल्याने गेले पाच वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला वैतागलेल्या नगराध्यक्षांनी पळ तर काढला नाही ना? अशीही शंका येत आहे. सर्व सामान्य घरातील महिला नगराध्यक्ष सातारा पालिकेला मिळाली आहे, हे दाखवण्यासाठी तरी त्या पालिकेत हजर पाहिजेत. त्यामुळे गायब झालेल्या नगराध्यक्षा कदम यांचा शोध घेणाऱ्याला आपण संपूर्ण पोशाख करू, असा उपरोधिक टोला मोने यांनी लगावला आहे.

error: Content is protected !!