रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाईतील उत्कर्ष सहकारी पतसंस्था आणि वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “वाई फेस्टिवल” अंतर्गत येत्या गुरुवारी (दि.१२) साताऱ्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रति वर्षानुसार यंदा सलग १७ व्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीसह “वाई फेस्टिवल”चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आठ ते २२ डिसेंबर दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्राशी निगडित उपक्रम घेण्यात येत आहेत.
“वाई फेस्टिवल” हा केवळ औपचारिक कार्यक्रम नाही, तर वाईच्या मातीशी, परंपरेची आणि संस्कृतीशी जोडलेला अनोखा उत्सव आहे. केवळ कलाकारांसाठी व्यासपीठ नव्हे तर रसिकांसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम असून त्या अंतर्गत दरवर्षी रक्तदान शिबिरही घेण्यात येते. त्यानुसार सातारा येथे गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता उत्कर्ष पतसंस्थेच्या देवी चौक परिसरातील शाखेत रक्तदान शिबिर होत आहे.
अधिकाधिक संख्येने रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहनही फेस्टिवलचे अध्यक्ष शरद चव्हाण, निमंत्रक अमर कोल्हापुरे, खजिनदार रमेश यादव, सचिव सुनील शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८६८७ १०० १०० या मोबाईलवर संपर्क साधावा, असे संयोजन समितीने कळवले आहे.
You must be logged in to post a comment.