डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

पिंपरी चिंचवड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय बैठक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष सनी शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पार पडली.या बैठकीत पुण्यात डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा होणार असून याबाबत पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार पुण्यात डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय बैठक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे तसेच राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, महिला पत्रकार श्रावणी कामत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, संतोष गोतावळे,महावीर जाधव, रामकुमार शेंडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

बैठकीमध्ये लंडन वरून मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. राज्यस्तरीय कार्यशाळेची रुपरेषा त्यांनी जाणुन घेत योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होणार असून ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियाच्या या विंगमध्ये युट्युब आणि पोर्टलचे संपादक, उपसंपादक, पत्रकार यांना सामावून घेत त्यांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक कशी केली जाईल हे समजावुन सांगण्यासाठी ही महत्त्वाची कार्यशाळा आहे. राज्यातील प्रसिद्ध तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. युट्यूब व पोर्टलच्या माध्यमातून जाहिराती व आर्थिक स्थितीची माहिती या कार्यशाळेतुन मिळणार आहे.खरंतर मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस शेख मन्सुरभाई, कोषाध्यक्ष विजय जोशी हे सर्वजण निश्चितच आपल्या सर्वांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी कायम आपल्या सोबत असतात. राज्यभरातील यु ट्यूब आणि पोर्टलचे संपादक,उपसंपादक, पत्रकार हे या राज्यस्तरीय कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने कसे उपस्थित राहतील यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यांच्या नोंदी घेणे गरजेचे असल्याचे मत ही राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.

राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या अडचणीचा पाढा वाचला. त्यामधून मार्ग दाखविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे दारे आपल्यासाठी सदैव खुले आहेत. डिजिटल मिडिया परिषदेचे अधिकृत आणि कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी त्याचे निकष समजावून घेण्याबरोबरच आपल्या हक्काच्या मेहनतीच्या मागण्या मान्य कशा पद्धतीने केल्या जातील हेच या कार्यशाळेच्या माध्यमातून कळणार आहे. पुण्यात होणाऱ्या कार्यशाळेत डिजिटल मीडिया परिषदेची माहिती पुस्तिका असणार आहे. नियमितपणे काम करणाऱ्या पत्रकारांना अडचणीचा सामना कसा करावा लागतो.वाईट गोष्टींना आळा बसणे आणि पत्रकारांच्या सकारात्मक व नकारात्मकतेवर राज्यस्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार असल्याचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!