आंतरधर्मीय लग्न केल्यानेच होळ ऑनर किलिंग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रेम प्रकरणातून सातारा जिल्ह्यात मेहुण्यानेच भावोजीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शकील अकबर शेख (वय २१) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. फलटण तालुक्यातील जिंती इथं ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मेहुणा मोन्या निंभोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेतलं आहे.

आंतरधर्मीय लग्न केल्यानेच हे ऑनर किलिंग झाल्याची माहिती समोर येत असून या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वीही संशयित मोन्याने भावोजी शकील शेख याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला होता.

शकील शेख याने साधारण दीड वर्षांपूर्वी मोन्या निंभोरे याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनी आंतरधर्मीय लग्न केल्याचा राग मोन्याच्या मनात होता. लग्न झाल्यानंतर शकीलच्या पत्नीने आपले नाव बदलून खुशी असं केलं. शकील आणि त्याची पत्नी हे जिंती येथील विकासनगर इथं राहत होते. लग्न केल्यानंतर २८ डिसेंबर २०१९ रोजी मोन्याने शकील याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, यातून शकील हा थोडक्यात बचावला होता.

अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही मोन्याच्या डोक्यातील राग शांत झाला नाही. त्यामुळे सोमवारी (१६ ऑगस्ट) दुपारी शकील व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे हे दोघे दुचाकी (क्रमांक एम. एच. ११ एस ४४३४) वरून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती येथे गेले होते. तेव्हा कपडे घेऊन परतत असताना रात्री ९ च्या सुमारास शकीलच्या दुचाकीला गाडी आडवी लावत चार ते पाच जणांनी शकील याचे अपहरण केले. शकील हा उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो आढळला नाही. त्यामुळे शकील याची पत्नी खुशी शकील शेख (वय २२) हिने त्याच्या अपहरणाची तक्रार दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे गतीमान केली. शकील याचा शोध घेत असताना पोलिसांना होळ, ता. फलटण येथे त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोनि नितीन सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दाखल झालेली अपहरणाची तक्रार व वर्णनावरून तो मृतदेह शकील याचा असल्याचे समोर आले.

घटनास्थळी शकील याचा मृतदेह चिखलात पालथा आढळून आला. त्यामुळे चिखलात दाबून त्याचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.अपहरणाची तक्रार व त्यानंतर खून झाल्याने प्रेम प्रकरणातूनच मोन्या यानेच भावोजीचा खून केला असण्याची शक्यता गृहीत धरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोन्या मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

error: Content is protected !!