२० वर्षांच्या लढ्यानंतर इतिहासाच्या विकृतीला न्यायालयाची चपराक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जेम्स लेन लिखित “Shivaji: The Hindu King in Islamic India” या वादग्रस्त पुस्तकप्रकरणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागत ती माफी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित होणाऱ्या एका इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट पीठाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर ही माफी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानाशी निगडित दीर्घकालीन न्यायालयीन लढ्याचा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने २००३ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील काही परिच्छेद व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे व अपमानास्पद असल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (कै.) ॲड.धैर्यशील पाटील यांच्यामार्फत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया आणि लेखक जेम्स लेन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे माजी कार्यकारी संचालक सईद मंझर खान तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक डॉ.श्रीकांत बहुलेकर, प्राध्यापक सुचेता परांजपे, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्राचे ग्रंथपाल व्ही.एल.मंजूळ यांच्यासह दहा जणांवर सातारा येथील न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. या तक्रारीचा विचार करून सातारा न्यायालयाने दिनांक २ एप्रिल २००५ रोजी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत प्रक्रिया जारी केली होती.
त्यानंतर आदेशाविरोधात संबंधित चार आरोपींनी उच्च न्यायालयात दंडविषयक रिट याचिका दाखल केल्या होत्या. या याचिका दीर्घकाळ प्रलंबित होत्या.दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट पीठाचे, न्यायमूर्ती शिवकुमार सी. दिगे यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने न्यायालयात असे सांगण्यात आले की, ते तक्रारदार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माफी मागण्यास तयार असून ही माफी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित होणाऱ्या मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध केली जाईल.

न्यायालयाने याची दखल घेत आरोपींना १५ दिवसांच्या आत माफी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार सदर माफी वृत्तपत्रीय जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या माफी जाहिरातीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने नमूद केले आहे की, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना लाखो लोकांच्या हृदयात अत्यंत सन्मानाचे व अगाध स्थान आहे. त्यांच्या वारशाशी निगडित तीव्र सार्वजनिक भावनांचा आदर करत पुस्तकातील मजकुरामुळे सामान्य जनतेला झालेल्या कोणत्याही दुःखाबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल बिनशर्त माफी मागण्यात आली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधित्व ॲड. शैलेश चव्हाण, ॲड. रणजित पाटील, ॲड. सुजित निकम आणि ॲड. धवलसिंह पाटील यांनी केले .
१३ जानेवारीला सातारा न्यायालयातील खटल्याची सुनावणी
खासदार उदयनराजे भोसले यांनी २००४ मध्ये सातारा न्यायालयात याबाबतचा मूळ फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्यातील पुढील टप्प्यातील उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार एका वृत्तपत्रात माफीनामा आला आहे, तसेच उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे; परंतु मूळ खटल्याची सुनावणी सातारा न्यायालयात १३ जानेवारी २०२६ ला होणार असल्याची माहिती ॲड. ताहिर मणेर यांनी दिली. या सुनावणीत काय होणार, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, या जाहीर माफीनंतर शिवप्रेमी व इतिहास अभ्यासकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, ऐतिहासिक महापुरुषांबाबत लेखन करताना संशोधन, जबाबदारी आणि संवेदनशीलता आवश्यक असल्याचा ठोस संदेश या निकालातून मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.
You must be logged in to post a comment.