सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लोणंद येथील सोना अलाईज कंपनींच्या माध्यमातून २१ टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी सांगितले असून लवकरात लवकर याचे उत्पादन सुरू होऊन ३ जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी 100 बेडचे कोरोना सेंटर सुरू केले असून त्याचे उदघाटन रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, नंदकुमार भोईटे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले की ,कोरोनाचे अभूतपूर्व संकट हे संपुर्ण मानवजातीवर आलेले आहे. या महामारी मध्ये कुणीही कुठल्याही प्रकारचे राजकारण करु नये. कोरोनाची पहिली लाट आल्यावर फलटण नगरपरिषदेच्या सहकार्याने आणि लाईफ लाईन हॅास्पीटल द्वारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. पहिली लाट ओसरल्यानंतर ते बंद करण्यात आले. आता पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे.कोरोनामुळे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे. संकटाच्या काळात काम करताना बेड्स व हॉस्पिटल सुविधा निर्माण करणे हे गरजेचे आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक निंबाळकर सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे व किरण भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
You must be logged in to post a comment.