मेढ्यात उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट ;आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

मेढा येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या जागेची पाहणी करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मनोज जाधव, सोपान टोणपे, राजेंद्र पोळ आदी. 

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे. 

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही थैमान घातले आहे. दररोज दीड ते दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला आहे. मेढा येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून चर्चा केली. या प्लांटसाठी निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी लागणारा संपूर्ण निधी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा प्लांट उभा राहण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. 


प्लांट निर्मितीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून या जागेची पाहणी सोमवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष कल्पना जवळ, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अमोल पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. 


ऑक्सिजन प्लांट उभा राहिल्यानंतर जम्बो कोव्हीड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटल्सना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे या प्लांटची लवकरात लवकर उभारणी करून जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय तातडीने दूर करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

error: Content is protected !!