सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी विवेकवाद रुजवला. आता विवेकवादी लोकांसमोर संपूर्ण देशातील सर्वच क्षेत्रात वाढत चाललेल्या विषमतेचे मोठे आव्हान आहे. याचा सामना आपण करू शकलो नाही तर आपण अपयशी ठरू,’ असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मांडले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ८व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानात ‘भारतीय लोकतंत्र और विवेकवादी शक्तियों के सम्मुख चुनौतिया’ या विषयावर ते बोलत होते.
पी. साईनाथ म्हणाले, ‘लोकशाही वाचवणे, स्वत:ला जिवंत ठेवणे, कट्टरवादाचा सामना करणे, असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी सतत अहिंसेच्या मार्गाने लढत राहणे ही महत्त्वाची आव्हाने विवेकवाद्यांपुढे आहेत. देशात १९९१मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे गरीब, श्रीमंत दरी मोठ्या प्रमाणावर वाढली. आता तर देशातील १० टक्केच लोक गर्भश्रीमंत अन् ९० टक्के जनता कंगाल अवस्थेत जीवन जगत आहे. देशामध्ये १४० डॉलर ‘अरब पती’ तयार झालेत. हे लोक देशाच्या जीडीपीएवढे श्रीमंत आहेत. कोरोनाच्या काळात देशाचा जीडीपी ७.७ टक्क्यांवर घसरला, तसेच करोडो लोक बेरोजगार झाले तेव्हा या १४० धनदांडग्या व्यक्तींची श्रीमंती १०० टक्क्यांनी वाढली. ग्रामीण भागात राहणाऱ्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबांची महिना कमाई ५ हजारांपेक्षा कमी आहे. देशातील जे गर्भश्रीमंत उद्योगपती आहेत, त्यांच्याएवढी कमाई करायची झाल्यास नरेगा योजनेतील मजुराला ४ करोड वर्षे काम करावे लागेल. एवढी भीषण आर्थिक असमानता आहे, या असमानतेशी लढा द्यावा लागणार आहे.’डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे हे विवेकवादी भौतिकदृष्ट्या आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांच्या मार्गानेच आपण प्रतिगामी विचारांचा सामना करू शकतो, असे स्पष्ट केले.
पी. साईनाथ पुढे म्हणाले की, ‘उत्तरप्रदेशची निवडणूक होती म्हणून कोविडचे कारण देऊन कुंभमेळा पुढे ढकलला. या कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू शकतो, हे माहीत असतानाही एक वर्ष टाळून दुसऱ्या वर्षी कुंभमेळा घेण्यात आला. या कुंभमेळ्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गंगेत स्नान केल्यानंतर व गायमुत्र प्यायले तर कोरोना होणार नाही, असे जाहीरपणे सांगत होते. अलिकडच्या काळात जात, धर्म, पंथ, राज्य, समुदाय यांचा कट्टरवाद वाढला आहे. राजस्थान हायकोर्टमध्ये ४० वर्षे मनूची भली मोठी मूर्ती ठेवण्यात आली होती, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ट्रॅफिक सिग्नलवर आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी २०१७मध्ये राज्यघटना बदलण्यासाठी भाजप सत्तेवर आली आहे, काही वर्षातच राज्यघटनेमध्ये बदल करणार आहोत. ‘मनुस्मृती’ ही आमची पहिली राज्यघटना आहे, असेही ते म्हणाले होते. हा सर्व कट्टरतावाद असून, तो देशासाठी धोकादायक आहे, संविधान वाचविण्यासाठी विवेकवाद्यांना लढावे लागणार आहे.’ यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता दाभोलकर यांनी केले.
You must be logged in to post a comment.