सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील एकूण १६ ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पंचायतराज दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायतराज मंत्री उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह राज्यातील ग्रामपंचायतीचे प्रमुख उपस्थित होते. आज झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील एकूण ३१३ पंचायतींना सन्मानित करण्यात आले.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ (पडताळणी वर्ष २०१९-२०) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) व राहाता (जि.अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना उत्कृष्ट कार्यासाठी ऑनलाइन रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये रोख ऑनलाइन माध्यमाने खात्यात जमा करण्यात आले. तर, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये रोख रकम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.यासह राज्यातील १४ग्रामपंचायतीच्या कामाच्या गुणवत्तेनुसार या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यामध्ये मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर), लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि.चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या १४ ग्रामपंचायती आहेत. या १४ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.
You must be logged in to post a comment.