पांचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना ‘भास्कर’ अवार्ड जाहीर

पांचगणी,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पांचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा ‘द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. याबद्दल श्री पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजणांना द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड देवून गौरव करते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आणि जगप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र असणाऱ्या पांचगणी पोलीस स्थानकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. महाबळेश्वर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांनी आपला प्रशासकीय सेवेत वेगळा ठसा उमटवला आहे. सर्वसामान्य नागरिक व पोलिस या दोघांमध्ये समन्वय ठेवत त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करीत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्यांची व्यथा ऐकून त्यांच्या समस्या लगेच सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यावर भर दिला आहे.

एक सक्षम, डॅशिंग आणि हुशार पोलीस अधिकारी म्हणून सतीश पवार हे सर्वपरिचित आहे. राज्यशास्त्र विषयातून पदवी प्राप्त झाल्यानंतर एमपीएससी परीक्षा प्राप्त करून श्री पवार पोलीस दलामध्ये सेवा बजावण्यास सज्ज झाले. बारा वर्षांपासून ते • महाराष्ट्र पोलीस मध्ये अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. या महाराष्ट्र पोलीस सेवेत काम करत असताना सतीश पवार यांनी अनेक ठिकाणी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. गुन्हेगारी विश्वामध्ये अनेकांना बदल घडवून वठणीवर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. पवार यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने यंदाचा प्रशाकीय सेवेतील द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड जाहीर केला आहे.

हा पुरस्कार सोहळा गोव्यातील रवींद्र भवन नाट्यगृह येथे शनिवार दिनांक २८ मे रोजी पार पडणार असून या पुरस्काराबद्दल श्री.पवार यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!