सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील खासगी शाळांच्या मनमानीविरुद्ध आणि सातत्याने पालकांच्यावर होत आलेल्या अन्यायाविरुद्ध अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंत लढण्याचा नारा देत सातारा जिल्हा पालक संघ स्थापन करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
गेले वर्षभरामध्ये पाचवीपर्यंत च्या शाळा बंदच आहेत, पाचवी ते नववी पर्यंत च्या शाळा अगदी थोड्या कालावधीसाठी चालू झाल्या अन परत बंद झाल्या, नववी दहावीचे वर्गाचे चित्र पण अगदी निराशजनक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु देण्याची परवानगी देताच शाळांनी त्याकडे पाऊले उचलत जमेल तसे ऑनलाईन शिक्षण देणे सुरु केले. ऑनलाईन शिक्षणसासाठी सुद्धा पालकांना भुर्दंड बसला आहेच, वेगवेगळे इंटरनेट चे पॅक्स आणि आवश्यक्यता लागल्यास मोबाईल / लॅपटॉप आपापल्या गरजा अन आवाका बघत पालकांनी घेतले. कोरोना चा प्रादुर्भाव डिसेंबर पासून कमी होताच सुरवातीला नववी आणि दहावी अन त्यानंतर पाचवी ते नववी पर्यंत चे वर्ग राज्यसरकारने सुरु केले. परंतु केवळ 45 दिवसातच पुन्हा कोरोना वाढत आल्याने शाळा बंद करण्यात आल्या.
खासगी शिक्षण संस्थांनी पालकांना फी मध्ये कोणत्याही स्वरूपाची सवलत न देता पूर्ण फी भरण्याचा तगादा लावला. यासाठी शाळेतील शिक्षकांना या वसुलीचा जणू ठेका देण्यात आला. वास्तविक कोरोना मुळे सर्वांचेच आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे, लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हे सहज समजणारी गोष्ट ध्यानात न घेता खाजगी शाळा या कॉर्पोरेट पद्धतीने वागत आहेत. शिक्षकांचा पगार, बिल्डिंग मेंटेनन्स, लाइटबिले हि अशा विविध ढाली पुढे करून पालकांना पूर्ण फी भरण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणत आहेत. मुलांना ऑनलाईन क्लासच्या ग्रुप मधून बाहेर काढणे, मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल याची भीती घालणे, ग्रुप वर फी भरू न शकलेल्या पालकांची नावे जाहीर करून त्यांना लज्जित करणे असे प्रकार खासगी शाळा करू लागल्या आहेत. यामध्ये शाळेत असणारा पालक-शिक्षक संघाचा वापर शाळा स्वतःच्या फायद्यासाठी करीत असून त्यांच्याद्वारे पालकांना विविध डिस्काउंटच्या ऑफर्स देत फी भरण्यासाठी दबाव आणत आहेत. याला पालक-शिक्षक संघाच्या एखाद्या मेंबर्सनी विरोध केल्यास त्याला धमकावण्याचा प्रकार सुद्धा होत आहेत. या सर्वाला कंटाळून आता साताऱ्यातील सर्व शाळेतील पालकांनी एकत्र येत या मनमानी आणि हिटलरशाहीला लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले असून त्यासाठीच साताऱ्यातील विविध पालक संघटनांच्या प्रतिनिधी यांनी एकत्र येत पुढील काळासाठी लाईन ऑफ ऍक्शन आणि पाठपुरावा करीत सातारा जिल्हा पालक संघ स्थापित करण्याचे ठरविले.
पालकांना फी भरण्याची कोणतीही अडचण नसून शाळांनी या शैक्षणिक वर्षात जी सर्व्हिस दिली त्याचेच मूल्य घ्यावे ही साधी व्यावहारिक मागणी असणार आहे. शाळा स्वतःच एक रुपया सुद्धा नफा सोडायला तयार नाहीत त्यामध्ये रयत शिक्षण संस्था, डेक्कन एजुकेशन संस्था अशा संस्था पण आहेत याबद्दल पालकांनी मोठी नाराजी होती. ज्यू , नर्सेरी अशा वर्गांनाही 25000 ते 50000 रुपये फी भरण्यास सांगण्यात येत आहे याबद्दल पालकांमध्ये मोठा रोष होता. मात्र आता सहन नाही करायचे तर शिक्षणाच्या नावाखाली खिसेभरू शिक्षण संस्थांना प्रत्यक्षात वठणीवर आणायचे असे एकमताने ठरविण्यात आले आहे. पालक संघाच्या वाढत्या प्रतिसाद पाहता खाजगी शिक्षण संस्था सुद्धा सावध झाल्या असून त्यांच्यात गुप्त बैठक होत असल्याची चर्चा आज शिक्षण वर्तुळात होती.
पालक संघ स्थापन करण्यासाठी रितेश रावखंडे, किशोर सूर्यवंशी, सौ श्रुतिका गुजर, सौ, दीप्ती पाटील, पंकज नागोरी, सुजित जाधव, गणेश नलावडे, जयश्री शेलार, निलेश झरेकर, संदीप घाडगे, निलेश उल्कने, प्रशांत मोदी, माणिक कांबळे असे जवळपास शंभर च्या वर पालक प्रयत्नशील आहेत.
You must be logged in to post a comment.