परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांनो, होम क्वारंटाईनचे नियम पाळा

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आढावा बैठकीत आवाहन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘सातारा जिल्ह्यात बाहेरुन येणार्‍या नागरिकांनी गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) प्रशासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत. आपल्या नियमभंगामुळे जवळचे नातेवाईक तसेच गावातील नागरिक बाधित होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी गाव आणि जिल्ह्याचे हित लक्षात घेऊन गृह विलगीकरणाचे नियम पाळावेत आणि गाव समितीने याकडे विशेष लक्ष द्यावे,’ असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती आणि कोरोना संदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे  उपस्थित होते.
 ज्या शाळांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्या शाळा अतिवृष्टीत असुरक्षित असतील तर त्याची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच बाहेरुन आलेल्यांना त्यांच्या राहत्या घरी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विलगीकरणात ठेवण्यात येत आहे ते नागरिक काटेकोर विलगीकरण पाळतील याकडे गाव समित्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना शंभूराज देसाई यांनी केल्या.

पाटण आणि कराडसाठी बोटी वितरित
पाटण आणि कराड तालुक्यात अतिवृष्टीच्या काळात पुराचा धोका असतो. हे ओळखून प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच एनडीआरएफ टीमचे नियोजन केले असून पाटण आणि कराडसाठी बोटीही वितरित केल्या आहेत. पूर परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही एनडीआरएफकडून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
error: Content is protected !!