सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या निधनाने सहकार, सामाजिक क्षेत्रासह आणि काँग्रेस परिवाराची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी उंडाळे येथे जाऊन उंडाळकर परिवाराचे सांत्वन केले. काकांच्या अनंत आठवणी यावेळी दाटून आल्या. सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते.
कराड तालुक्यातील उंडाळे गावी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रतिमेला अजित पवार यांनी अभिवादन केले आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच अॅड. उदयसिंह उंडाळकर-पाटील यांंचे सांत्वन केले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, काकांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची अपरिमित हानी झाली आहे. काकांच्या अनंत आठवणी यावेळी दाटून आल्या. सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते.
सातारा येथील काॅंग्रेस भवनात झालेल्या शोकसभेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला संसदेत पाठविण्यामध्ये विलासकाकांचे योगदान होते. त्यांचे आणि आमच्या कुटुंबियांचे अनेक वर्षापासून ऋणानुबंध होते. पण काही वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबियांमध्ये मतभेद झाली. त्याचीच जास्त चर्चा झाली. या शोकसभेस शिक्षक आमदार जयंत आसगावकर, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.