निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर अखेर हयातीचे दाखले सादर करावेत : जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी १ नोव्हेंबर रोजी हयात असलेबाबतचा दाखला ते ज्या बँकेमधून निवृत्ती वेतन घेत आहेत त्या बँकेकडे दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीच्या दाखल्याच्या नोंदवहीत आपल्याच नावासमोर खात्री करुन स्वाक्षरी अथवा अंगठा करावा,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.

हयातीच्या दाखल्याची नमुना नोंदवही या कोषागारामार्फत सर्व बँकांकडे, शाखांकडे पुरविण्यात येतील. मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेणा-या निवृत्ती वेतनधारकांना या कार्यालयामार्फत हयातीचे दाखले पुरविण्यात येतील. त्यांनी त्यांच्या दाखल्यावर पोस्ट मास्तर अथवा शासकीय राजपत्रित अधिकारी यांची सही, शिक्का घेवून या कार्यालयास पाठवावेत. हयातीच्या दाखल्यावरील मजकूर अचूकरित्या भरुन देणे आवश्यक आहे. तसेच परदेशात राहत असलेल्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी विहीत मार्गाने जिल्हा कोषागार कार्यालयास हयातीचे दाखले प्राप्त होतील याची काळजी घ्यावी.ज्यांचे दाखले संबंधित बँकांमार्फत ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोषागार कार्यालयात प्राप्त होणार नाहीत, त्यांचे माहे डिसेंबर २०२३ चे निवृत्ती वेतन संगणक प्रणालीद्वारे आपोआप थांबविले जाणार असल्याची नोंद सर्व निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी.

हयातीचे दाखले देण्याच्या पध्दती व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय १५.१.२०१६ नुसार निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे हयातीचे दाखले/जीवनप्रमाणपत्र (DIGITAL LIFE CERTIFICATE) ऑनलाईन स्वरुपात देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केलेली आहे. तरी ज्यांना आपला हयातीचा दाखला/जीवनप्रमाणपत्र (DIGITAL LIFE CERTIFICATE) ऑनलाईन स्वरुपात द्यावयाचा आहे त्यांनी तो सादर करावा.

सर्व पध्दतीने हयातीचे दाखले दि.३० नोव्हेंबर पर्यंतच सादर होतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच ज्या कुटूंबनिवृत्ती वेतनधारकांना वयाची ८० वर्षे पुर्ण झालेली आहेत, अशा कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी वयाच्या पुराव्यासह (पॅन कार्ड, आधार कार्ड) जिल्हा कोषागार कार्यालयास संपर्क साधावा, असेही आवाहन श्रीमती नांगरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!