मनोरुग्णाने जळालेल्या मृतदेहाचे खाल्ले मांस ; फलटणमधील धक्कादायक घटना

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाट आल्यामुळे राज्यात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फलटण शहरातील एक परप्रांतीय मनोरुग्णाला आज दिवसभरात त्याला काहीच खाण्यास मिळाले नाही. त्यामुळे लागलेली भूक भागवण्यासाठी त्याने चक्क स्मशानभूमीत जाऊन तेथील अर्थवट जळलेला मृतदेह खाऊन आपली भूक भागवल्याची धक्कादायक घटना घडली.

फलटण शहरामध्ये कोरोना मृत रुग्णांसाठी फलटण ते पंढरपूर रोडवर नीरा उजवा कालवा लगत राव रामोशी पुलाजवळ कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी स्मशानभूमी शासनाने अधिग्रहित करून तेथे कोरोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी अंत्यसंस्काराची सोय केली आहे. मागील एक महिन्यापासून कोरोना वाढल्याने यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस  वाढली असून दररोज दहा ते पंधरा लोकांवर कोळकीच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.

प्रेते जाळण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने मृतदेह जास्त झाल्यावर एकाच ओळीत 4 ते 5  प्रेते जाळली जात असून प्रेत जाळल्यानंतर तेथे कोणीही थांबत नाही. फलटण ते पंढरपूर हा रस्ता 24 तास वर्दळीचा असला तरी सध्या लॉकडाऊन मुळे या मार्गावर वाहतूक खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या स्मशानभूमीत वेडसर लोकांचा वावर वाढलेला आहे. काल संध्याकाळी उशिरा काही मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावर नगरपालिकेचे कर्मचारी निघून गेले होते.सकाळी वेडसर असणाऱ्या मनोरुग्णाने जळत असणाऱ्या चितेतून मानवी अवयव काढून ते खाण्यास सुरुवात केली जे अर्धवट जळालेले अवयव होते. ते अवयव तो पुन्हा भाजून खात असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत नगरपालिकेला कळविले. काही लोकांनी त्यावेळेस तर त्या वेडसर माणसाला  मारून हाकलून लावले. दरम्यानच्या काळात तो मानवी देहाचे अवयव खात असल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पसरताच सर्वत्र खळबळ उडालीअसून या घृणास्पद प्रकाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

कोरोना बाधित मृत लोकांचे अवयव त्याने खाल्ल्याने तो स्वतःही बाधित झाला असण्याची शक्यता आहे या वेडसर माणसांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. फलटण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, बाधीत रुग्णांच्या मृत्यूंचीसंख्या वाढत असल्याने फलटणच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीत बाधितांचे मृतदेह जाळण्यात येत आहेत.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून पूर्ण मृतदेह जाळल्यानंतरच फलटण नगरपालिकेचे कर्मचारी परत येत असतात. त्यांनतर त्याठिकाणी कुणीही थांबत नाही.आज घडलेली घटना ही चुकीची असून त्याठिकाणी आलेला व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याने त्याने सोबत आणलेले चिरमुरे खाल्ले असल्याचे पोलिसांना त्या तरुणाने सांगितले आहे. त्याठिकाणी अर्धवट कोणताही मृतदेह जळलेला नव्हता त्यामुळं असा प्रकार घडला नसल्याचे फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!