पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ,धक्काबुक्की, दमदाटी करून शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, १८ ऑगस्टला दुपारी साडे बाराच्या सुमारास फलटण शहर पोलीस स्टेशनच्या दुय्यम अधिकारी यांच्या केबिनमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम (वय २८ वर्ष ) व पोलीस नाईक वाडकर हे दैनंदिन काम करत असताना राम वसंत पवार यांचा तक्रारी अर्ज चौकशी करीता ते व त्यांचा भाऊ लखन वसंत पवार यांच्यासोबत मंगेश प्रमोद आवळे, उमेश नरसिंग पवार, रोहित संतोष अडागळे, राकेश राजेश पवार (सर्व रा. सोमवार पेठ फलटण) हे पण आलेने पवार बंधू वगळता इतरांना कदम यांनी बाहेर बसण्यास सांगितले असता त्यांनी हुज्जत घालून वादावादी करीत शिवीगाळ व दमदाटी केली.

धक्काबुक्की करून शर्टाची बटने तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद अमोल कदम यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. वरील सहा जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सर्वाना अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

error: Content is protected !!