फलटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहरातील वर्दळीचा व मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या डीएड चौकात रिंगरोडवर काल रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हरलोड भरलेली उसाची ट्रॉली लॉक तुटल्याने पाठीमागे वेगाने धावली. परंतु, तेथे वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. एकूणच ‘काळ आला पण वेळ आली नव्हती’ असेच उद्गार अनेकांनी या घटनेनंतर काढले.
येथील डीएड चौकातून जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र चढ असल्याने एकेरी वाहतूक असतानाही ही वाहने लगतच्या दुसऱ्या रोडने चुकीच्या बाजूने धावतात. काल ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरपासून लॉक तुटल्याने उसाने भरलेली ट्रॉली उताराने मागे धावू लागली. या प्रकाराने अनेकांचे धाबे दणाणले. ही ट्रॉली थांबविण्यासाठी अनेक लोकही धावले. परंतु, त्यास यश आले नाही. ट्रॉली वेगाने मागे येऊन रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला व त्यावरील विजेच्या खांबाला धडकून थांबली. हा रस्ता वर्दळीचा असला तरी हा प्रकार घडला, त्या क्षणी तेथे वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकाराने नागरिकांमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले.
You must be logged in to post a comment.