फणसेवाडी ग्रामस्थांनी दुरुस्त केला श्रमदानातून रस्ता

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पक्का रस्ता नसल्यामुळे गेली अनेक वर्षे नांदगणे गावातील वाई तालुक्यातील फणसेवाडी वस्ती अनेक समस्यांना तोंड देत आहे. नांदगणे – फणसेवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता येथील ग्रामस्थ दरवर्षी स्वखर्चाने व श्रमदानाने दुरुस्त करतात. यावर्षीही ग्रामस्थांनी रस्ता नुकताच दुरुस्त केला.

श्री केदारेश्वर स्वयंसेवी संस्था स्थापन करून येथील तरुणांनी जून महिन्यातच सुमारे दहा हजार रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला होता. परंतु 22 ,23 जुलैच्या अतिवृष्टीने रस्ता वाहून गेला. त्याच्यातून नीट चालताही येत नव्हते. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले होते त्यामुळे चालणे तर मुष्कीलच पण चार चाकी वाहन नेणे दुरापास्तच.त्यामुळे गेले पाच-सहा महिने फणसेवाडीचे रस्त्यावरील दळणवळण बंद होते.

या समस्येने ग्रस्त झालेल्या युवकांनी केदारेश्वर स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दादा फणसे, मार्गदर्शक तुकाराम फणसे, सखाराम फणसे व अन्य कार्यकर्त्यांनी आज एक ट्रॅक्टर ट्रॉली बोलावून संपूर्ण रस्त्यावर वस्तीच्या स्वयंखर्चाने मुरूम अंथरूण घेतला. तो मुरूम पसरवण्याचे काम ग्रामस्थ, महिला आणि युवकांनी दिवसभर केले.

error: Content is protected !!