पंतप्रधानांनी प्रवीण जाधवचा केला, “मन की बात” मध्ये गौरवपूर्ण उल्लेख

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे .जिल्हा परिषद शाळेचा फलटण तालुक्यातील सरडे येथील माजी विद्यार्थी प्रवीण जाधव याची ऑलिंपिक साठी राष्ट्रीय संघात तिरंदाजी या क्रीडा प्रकारात निवड झाली. इतकेच नव्हे तर या गौरवपूर्ण यशाचा उल्लेख स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या लोकप्रिय आकाशवाणी कार्यक्रमात केला. प्रवीण याच्यासह साताऱ्याचा देखील गौरव श्री मोदी यांनी केला. त्यांनी प्रवीणचे या निवडीबद्दल सातारकरांच्या नावासह अभिनंदन केले .उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह एकूणच जिल्हा परिषदेतून या यशाबाबत प्रवीणचे तर कौतुक होत आहेच; परंतु त्यासोबत जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता देखील उच्च कोटीची आहे हे सिद्ध झाल्यामुळे या सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे येथील प्रवीण जाधव हा 23 जुलैपासून जपानमधील टोकियो येथे सुरू होणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत आर्चरी अर्थात धनुर्विद्या म्हणजे तिरंदाजी या क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य दाखविणार आहे ! आणि जिल्हा परिषद शाळांचे कर्तृत्व आणखी प्रकाशमान करणार आहे. हा शेतकरी कुटुंबातील मुलगा अपार जिद्द आणि कष्ट यांच्या जोरावर देशाचा तिरंगा फडकविणार आहे .या बाबीचा सर्वांना अभिमान आहे असे विशेष गौरवोद्गार श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये काढले .सरडे गावात जिल्हा परिषद शाळेत उत्कृष्ट शिक्षण प्राप्त झाल्यानंतर अमरावती येथे धनुर्विद्या चे शिक्षण घेण्यासाठी प्रवीण याने प्रवेश घेतला 2015 मध्ये त्याची आंतरराष्ट्रीय ज्युनियर साठी निवड झाली होती .त्यानंतर 2016 मध्ये वरिष्ठ संघात संधी मिळवून प्रवीण यांनी आपले प्राविण्य सिद्ध केले.

सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी याबाबत समाधान व्यक्त करतानाच प्रवीण हा कष्टाळू आणि मेहनती आहेच, मात्र यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा, त्यातील शिक्षक, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त केली. कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनीदेखील प्रवीणचे विशेष कौतुक केले आहे. जिल्हा परिषद शाळा या कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. प्रगत भागासह दुर्गम, अतिदुर्गम भागातही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच; संबंधित भागातील पदाधिकारी शाळांच्या गुणवत्तेबद्दल विशेष कष्ट घेतात, हेच प्रवीण यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे .प्राथमिक शाळांची गुणवत्ता जिल्हा परिषद उत्तरोत्तर अधिक सुवर्णमय आणि यशपूर्ण करीत जाईल असा विश्वास या निमित्ताने सर्वांनीच व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!