महायुतीच्या सभेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले,मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी दिनांक २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर ता. कराड येथील ॲग्रीकल्चर कॉलेजच्या मैदानावर सभा होत आहे.ही सभा यशस्वी करून या सभेतूनच उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल असा ठाम विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान मोदीजींची सभा म्हणजे सौ सोनार की एक लोहार की, महाविकास आघाडीच्या किती सभा असल्या तरी मोदींची एक सभा आमच्यासाठी पुष्कळ आहे असे देसाई म्हणाले.
येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या कलादालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, लोकसभा प्रभारी अतुल बाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारणी महिला आघाडीच्या चित्रलेखा माने कदम, कांताताई नलावडे, जिल्हा युवती आघाडीच्या सुरभीताई भोसले, मनोज घोरपडे, दलित महासंघाचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड ,शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पूर्ण तयारी सुरू झाली असून सैदापूर येथील मैदानावर किमान एक लाख पेक्षा अधिक लोक येतील असा आमचा विश्वास आहे . या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उपस्थिती असेल यादृष्टीने नियोजन आहे . तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत सातारा ,कोरेगाव ,पाटण व वाई या चार मतदारसंघातून महायुतीला अनुकूल वातावरण आहे . उदयनराजे भोसले यांना चांगला पाठिंबा मिळत आहे या चार मतदारसंघातून उदयनराजे भोसले विक्रमी मताने निवडून येण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी करण्यात येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साताऱ्याच्या गादीवर प्रचंड प्रेम आहे या प्रेमापोटी ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे २९ रोजी येत असून त्यांची ही सभा उदयनराजे भोसले यांच्या विजयाची नांदी असेल असे ते म्हणाले.
पाटण मतदारसंघात कार्यकर्त्यांची नाराजी असल्याच्या मुद्द्यावर देसाई म्हणाले पाटणमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही.खासदार उदयनराजे भोसले व माझी चर्चा झाली आहे ,संघटनात्मक बांधणीचे नियोजन पक्के आहे तसेच या पुढील काळात प्रचार संपेपर्यंत पाटण मतदारसंघांमध्ये तब्बल ११ सभा होणार आहेत. कोरेगाव, वाई व सातारा या तीन मतदारसंघांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सभा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेण्याच्या आहेत मात्र महायुतीचे प्रचाराचे महाराष्ट्रातील वेळापत्रक बघून त्या पद्धतीने स्टार प्रचारकांच्या तारखा नियोजित करण्यात येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या चार सभा होणार आहेत याचा काय परिणाम होईल असे विचारले असता देसाई म्हणाले , सौ सोनार की एक लोहार की,महाविकास आघाडीच्या कितीही सभा झाल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकच सभा आमच्यासाठी पुरेसी आहे आणि याच सभेच्या माध्यमातून उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल असे ते म्हणाले.
वाई मतदार संघातील आमदार मकरंद पाटील व नितीन काका पाटील हे प्रचारात सक्रिय नसल्याचे विचारले गेले या प्रश्नाचे पालकमंत्र्यांनी खंडन केले ते म्हणाले त्यांच्या घरात घरगुती विवाह कार्यक्रम असल्यामुळे गडबडीत ते आहेत . मात्र वाई,खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघात पूर्ण ताकतीने महायुतीचा घटक म्हणून आमदार मकरंद पाटील हे उदयनराजे यांच्या बरोबर असल्याचे ना.देसाई यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान,याच व्यासपीठावर दलित महासंघ व बहुजन समाज पार्टीचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे उपस्थित होते.त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजाचे बहुसंख्य प्रश्न सोडवले आहेत. लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे येथील स्मारकाला २५ कोटी तसेच चिराग नगर घाटकोपर येथील स्मारकासाठी तीनशे पाच कोटी निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मातंग समाजाच्या अभ्यासासाठी संशोधन विकास केंद्राची घोषणा करण्यात आली आहे असे सांगून स्वतंत्र आयोगाची मातंग समाजासाठी करण्यात यावी अशी मागणी मच्छिंद्र सकटे यांनी केली.
You must be logged in to post a comment.