आजपासुन साताऱ्यात पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात

सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पारदर्शक भरती प्रक्रिया होणार : पोलीस अधीक्षक समीर शेख

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राज्यभरात आज बुधवार दिनांक १९ जूनपासून पासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार विविध उमेदवारांकडून त्यांच्या इच्छूक पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून आता पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील १७,४७१ रिक्त जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सातारा जिल्ह्यात देखील पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीत ही पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात २३५ रिक्त पदांसाठी तब्बल १३ हजार ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आजपासून पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया आजपासून २६ जून अखेर सुरू राहील.आज एक हजार उमेदवारांना बोलावले असून यापुढे रोज १३०० ते १५०० उमेदवारांना बोलावण्यात येईल.

या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यानव पारदर्शकता असावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या निगराणीत अत्यंत पारदर्शक ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांमध्ये उमेदवारांची व्हिडीओ शुटींगसुध्दा करण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे.पोलीस भरती परीक्षेसाठी सर्वात आधी ५० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. या परीक्षेत ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गातील जाहीरातीनुसार रिक्त पदाच्या १: १० प्रमाणामध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. या लेखी परीक्षेमध्ये उमेदवाराला ४० गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेत ४० पेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील.

error: Content is protected !!