पक्षांतर्गत झालेल्या कुरघोड्यांमुळे माझ्यावर अन्याय : सुनील माने

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बँकेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे काम केल्याने मला दुसऱ्यांदा संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु पक्षांतर्गत झालेल्या कुरघोड्यांमुळे निवडणुकीत अर्ज माघारी घ्यावा लागला. माझ्यावर अन्याय झाला असला तरी पक्ष सांगेल ते धोरण आणि पक्ष सांगेल ते तोरण बांधून पक्षवाढीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्षा नीता माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने, नगरसेवक चांदभाई आतार, रमेश माने, शशिकांत भोसले, विद्याधर बाजारे, शिवराज माने, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण भोसले आदी नगरसेविका नगरसेवक उपस्थित होते.

सुनील माने म्हणाले,राजकारणात एखादे नेतृत्व मोठं होत असताना अशा पद्धतीनं गोष्टी घडल्याने कार्यकर्ते नाराज झाले. यादरम्यान काही वावड्या उठू लागल्या त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढणे गरजेचे होते म्हणून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. राजकारणात पद हे काम करण्यासाठी असते. पक्ष सांगेल ते धोरण व पक्ष सांगेल ते तोरण बांधून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारणात संधी येतात आणि जातात मात्र संधी निर्माण करणे गरजेचे असते. संधी निर्माण करण्याची क्षमता रहिमतपूरच्या मातीमध्ये आहे. रहिमतपुरातील निवडणूक लागलेल्या सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी माझ्या ठरावाला काहींनी विरोध केला होता.विरोध करणाऱ्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक घेऊ नये स्वत:चा खांदा मजबूत करावा आणि स्वत:च्या खांद्याचा वापर करावा. स्वत:ला राजकारणात मोठे होता येत नाही म्हणून दुसऱ्याने मोठे होऊ नये ही भूमिका घेणे चुकीचे असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

error: Content is protected !!