सत्ता परिवर्तनाची सुरवात सातारा जिल्ह्यातून करावी : आ.पृथ्वीराज चव्हाण

सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव सातारा जिल्ह्यातून करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, काँग्रेसचा उमेदवार किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचा पराभव करून राज्यात सत्तापरिवर्तन करण्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करावी, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत बोलताना केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव, महिला अध्यक्षा अल्पना यादव, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील चिखलीकर, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे,बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, विश्वंभर बाबर, संदीप चव्हाण, संदीप माने, ॲड.श्रीकांत चव्हाण, संजय तडाखे, जगन्नाथ कुंभार निराश्रित व निराधार सेलच्या अध्यक्षा राधिका मखमली, अन्वर पाशा खान, राजू मुलांनी,विराज शिंदे, मनीषा पाटील, रजिया शेख, विकास पिसाळ, बाबसाहेब माने, दर्शन कवर,नरेंद्र पाटणकर,सुरेश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे सर्वच बाजूने अपयशी ठरत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीची आचारसंहितेचे कारण दाखवून बंद करण्यात असल्याचे कळत आहे. पण आचारसंहिता हा बहाणा आहे यांच्या तिजोरीत खडखडाट झालाय की काय ते सांगत नाहीत.त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परंतु नोव्हेंबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले की या योजनेत भरीव वाढ करून माय भगिनींना लाभ देवू .तसेच त्यांनी मोदी व शिंदे सरकारच्या कारभारावर टीका करून सांगितले की देशाचा आणि महाराष्ट्राचा कारभार चार गुजराथी चालवत आहेत .राज्यात अंबानी व अडाणी तर देशात कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे.

शिंदे सरकारने अडानीला मुंबईतील लाखो कोटी रुपयांची हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने दिली आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयाची जमीन देऊन राज्य आज कुठे नेऊन ठेवले आहे. त्यामुळे अशा महायुती सरकारला सत्तेवरून घालवणे हेच राज्याच्या हिताचे आहे.म्हणून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकत्यांनी काँग्रेस व आघाडीच्या सर्व उमेदवार जे असतील त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे शेवटी सांगितले.

यावेळी भानुदास माळी, अजित पाटील चिखलीकर, अल्पना यादव विश्वंभर बाबर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

स्वागत व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी केले.तर आभार संदीप चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!