कळंबा कारागृहातून पोलिस बंदोबस्तात प्रभाकर घार्गे यांची मतदान केंद्रावर एंट्री

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खटाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नंदकुमार मोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे अशी लढत होत आहे. आज मतदानासाठी न्यायालयाच्या परवानगीने कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून पोलिस बंदोबस्तात प्रभाकर घार्गे थेट वडुज येथील मतदान केंद्रावर दाखल झाले.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खटाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी नाकारून नंदकुमार मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे प्रभाकर घार्गे  हे कारागृहातून अपक्ष निवडून लढत आहेत. माजी आमदार दिलीप येळगावकर, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे. आज मतदानासाठी त्यांना न्यायालयाने एका दिवसांची परवानगी दिली. त्यामुळे ते मतदानासाठी सकाळी पोलिस बंदोबस्तात व पोलिसांच्या गाडीतूनच केंद्राबाहेर दाखल झाले.

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून थेट वडूज (ता.खटाव) येथील मतदान केंद्रावर घार्गे आले. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पत्नी इंदिरा घार्गे, कन्या प्रीती घार्गे, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, डॉ.दिलीप येळगावकर, आदी उपस्थित होते.  काहीकाळ वातावरण स्तब्ध झाले होते. मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते मतदान केंद्राच्या बाहेर थांबले होते. यावेळी त्यांचे समर्थकही उपस्थित होते.

error: Content is protected !!