सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महू धरणात आजोबांबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) या चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.
जावली तालुक्यातील महू येथील धरण परिसरात प्रणव आजोबांच्या सोबत गुरे चारण्यास गेला होता. त्यावेळी नजर चुकवीत पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसांपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलीस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवचा कोठेच ठावठिकाणा लागत नव्हता. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला. प्रणवचा मृतदेह सापडल्याचे समजताच संपूर्ण महू गाव धरणाकडे लोटला. यावेळी त्याच्या आई-वडिलांचा व कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. आजोबांनी प्रणवला दिलेली हाक शेवटचीच ठरली. येथे जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते. सदर घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.गेले दोन दिवसापासून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने , कुडाळचे पीएसआय महेश कदम, करहरचे डी. जी.शिंदे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. शिंदे आणि पोलीस पाटील अक्षरशः ठिय्या मांडून होते. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर प्रणवच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थही त्यांना सहकार्य करीत होते. अखेर आज सकाळी प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला. आणि महू गावावर शोककळा पसरली.
You must be logged in to post a comment.