सातारा जिल्ह्यातील पाच हजार जणांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई : पोलीस अधीक्षक समीर शेख

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे यासाठी ही कारवाई होणार असून ३३४ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदर्श आचारसंहिता निर्देशाचे पालन करण्यासंदर्भात पत्रकार परिषदेत घेतली होती, त्यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती पत्रकारांना दिली.

ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध असून १६५ पोलीस अधिकारी साडेतीन हजार पोलीस अंमलदार आणि ३४७१ होमगार्ड तैनात राहणार आहेत. सीआरपीएफ च्या तीन तुकड्या उपलब्ध होणार असून ११ नोव्हेंबर रोजी या तुकड्यांचे साताऱ्यात आगमन होत आहे.

रूट मार्च एरिया डॉमिनेशन, कोंबिंग ऑपरेशन असे विविध माध्यमातून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न होणार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पाच हजार लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे .अशा लोकांच्या वर्तणुकीचे हमीपत्र भरून घेणे त्यांना स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजेरीला बोलवणे त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे. या दृष्टीने पोलीस दक्ष राहणार आहेत २०२४ मध्ये निवडणुकांमध्ये ४४ गुन्हे दाखल झाले होते .याचे रिपोर्ट कोर्टात पाठवण्यात आले आहेत.याशिवाय सातारा जिल्ह्यात हिस्टरी शिटर व कुख्यात ३३४ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून निवडणूक काळामध्ये त्यांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील परवाना प्राप्त ३३४६ शस्त्रे आहेत. ही शस्त्रे तातडीने जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व पोलीस संयुक्तरीत्या बैठक घेणार असून ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही पॉकेट निश्चित करण्यात आले असून यामध्ये कराड शहर,म्हसवड, लोणंद,कोरेगाव आणि खंडाळा तालुक्याचा काही भाग निश्चित आहे.तेथे जादा मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे ११ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान रूट मार्च केले जाणार आहेत तसेच जाहीर सभांवर सायबर सेल सिक्युरिटी टीमचे विशेष लक्ष राहणार असून प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. जाहीर सभांच्या संदर्भातील सर्व परवानगी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये. मद्य अथवा पैसा यासारख्या आमिषाच्या अनुषंगाने गैरप्रकार होऊ नये म्हणून या कार्यकर्त्यांच्या घरांवर विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून ठेवले जाणार आहे अशी माहितीही पोलीस अधीक्षक शेख यांनी दिली.

error: Content is protected !!