कचरामुक्त शहर म्हणून सातारा नगरपालिकेचा गौरव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर कचरा कुंड्यामुक्त झाले आहे. तसेच कचरा उचलण्याचे काम नगरपरिषद उत्कृष्टरित्या करीत असल्याने केंद्र सरकारने सातारा शहरास कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये राज्यातील ६९पालिकांमध्ये साताऱ्यासह जिल्ह्यातील सात पालिकांना केंद्र शासनाचे कचरा मुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले आहे.याबाबत २०नोव्हेंबर रोजी पालिकांना दिल्ली येथील विशेष कार्यक्रमात पुरस्कार वितरित करण्यात येणार असून हा पुरस्कार सातारा पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजित बापट स्वीकारणार आहेत.

सातारा,कराड,वाईसह पांचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, रहिमतपूर या सातारा जिल्ह्यातील सात पालिकांना स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधील कचरा मुक्त शहर मानांकन प्राप्त झाले आहे. हे पुरस्कार नवी दिल्ली येथील विज्ञान भवनाममधे विशेष कार्यक्रमात दि २० नोव्हेंबर रोजी प्रदान करणेत येणार आहेत असे स्वच्छ भारत मिशन (अर्बन), भारत सरकार, नवी दिल्ली येथील संयुक्त सचिव तथा मिशन डायरेक्टर श्रीम. रूपा मिश्रा यांच्याकडून कळविणेत आले आहे.पालिकांनी कचरा मुक्तीसाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार या पालिकांना देण्यात आला आहे.

सातारा पालिकेची झेप

ओसांडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, त्यावर चरणारी मोकट गुरे, कुंडीभोवती असणारे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य हे चित्र बदलण्यासाठी १२ वर्षांपूर्वी शासनाने कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना पालिकांतून राबविण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातारा शहरांत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सुरवातीस चार वॉर्डच्या प्रभागात एक घंटागाडी होती. नंतर हळूहळू घंटागाड्यांची संख्या वाढवत आज प्रत्येक वॉर्डसाठी एक घंटागाडी सुरू आहे. ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, तेथूनच थेट कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू झाल्या. त्यानंतर शहरातील कचराकुंड्या काढण्यात आल्या. पूर्वी रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, चौकानजीक बांधीव अथवा पाइपच्या कुंड्या होत्या. पालिकेने त्या सर्व पाडून टाकल्या. कॅम्पॅक्‍टर हे वाहन ताफ्यात दाखल झाल्याने त्यासाठी आवश्‍यक लोखंडी कुंड्या पालिकेला घ्याव्या लागल्या. 

साताऱ्यात आज लोखंडी ७० कचराकुंड्या आहेत. या कुंड्या काढून कचराकुंडीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्ष आणली आहे. शहरात निर्माण होणारा १०० टक्के कचरा रोजच्या रोज उचलला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या पथकाने सातारा शहरातील कचऱ्याच्या संदर्भातील कामाची पाहणी केली या पाहणीच्या आधारित सातारा नगरपालिकेस हा पुरस्कार देण्यात येणार आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकांच्या नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष,पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!