सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध वक्ते डॉ. प्रा.यशवंत पाटणे (सातारा) यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांचा सन्मान केला जातो. प्रतिवर्षी हे सन्मान प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीदिनी १५ जुलै रोजी समारंभपूर्वक प्रदान केले जातात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे हे नववे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे यांना देण्यात आला आहे. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी गेली ४७ वर्षे प्रयत्नशील राहिलेल्या मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
आपल्या अमोघ आणि विचार संपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृध्द करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले.जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या मानसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. चार दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या लेखणीतून,व्याख्यानातून विचारजागर केला.प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ.पाटणे यांच्याविषयी विशेष आपुलकी होती.हा स्नेहानुबंध आणि डॉ. यशवंत पाटणे यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरवले असल्याचे प्रा.जोशी यांनी सांगितले.
प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वक्तृत्वाच्या प्रांतातले आमचे ‘विठ्ठल’ आहेत.आम्ही त्यांच्या विचारवाटेवरचे वारकरी आहोत.प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात आलेला हा सन्मान मला त्या विठ्ठलाचा प्रसाद वाटतो.ह्या सन्मानाला मला पात्र समजले हा माझा बहुमान आहे.या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.अतिरेकी चंगळवादाने मानसिक व सामाजिक संतुलन हरवत चाललेल्या समाजाच्या सांस्कृतिक संपन्नतेसाठी प्राचार्य भोसले यांनी आपल्या वाणीलेखणीतून विचारांचा जागर केला.त्यांच्या नावाचा सन्मान मला वक्तालेखक म्हणून नवे बळ देईल.हा विश्वास वाटतो.
-प्रा.डॉ.यशवंत पाटणे.
You must be logged in to post a comment.