सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली सातारकर शिखरकन्या प्रियांका मोहिते हिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते “तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
प्रियांका मोहिते हिने तरुण वयात एव्हरेस्टसोबत माउंट लोत्से, माउंट मकालु, माउंट अन्नपूर्णा ही जगातील अतिशय उंच शिखरे सर करणारी ती पहिली महिला भारतीय आहे. काही वर्षांपूर्वी तिला महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे.
जगातील १४ अष्टहजारी हिमशिखरांपैकी ४ हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून परिचित आहे. २०१३ मध्ये जगातील सर्वोच्च अशा माऊंट एव्हरेस्टवर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मिळवलेल्या यशानंतर, जगातील ४थे अत्त्युच्च ल्होत्से (८,५१६ मीटर), २०१९ मध्ये ५वे अत्त्युच्च मकालू (८,४६३ मीटर) आणि २०२१ मध्ये तर अत्यंत भयावह असे अन्नपुर्णा (८,०९१ मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरीत्या चढाई करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.
अगदी शालेय जीवनापासूनच प्रियांकाने गिर्यारोहणाच्या अनगड, अवघड साहसवाटांवर केलेली वाटचाल इतकी शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध आहे की या क्षेत्रातील परिश्रम आणि सातत्यपूर्ण यशाचे ती मुर्तीमंत उदाहरण होऊन बसली. गिर्यारोहणातील एक कणखर युथ आयकाॅन म्हणून तिने ओळख निर्माण केली.
प्रियांका हिचे रविवारी (ता.१४) सातारा शहरात सायंकाळी ५.१५ ला आगमन होणार आहे. पोवई नाका शिवतीर्थ येथे सातारकर यांच्या वतीने प्रियांका मोहिते हिचे स्वागत करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रियांका पुष्पहार अर्पण करून अभिवादन करेल.
या स्वागतास शहरातील विविध क्रीडा संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी आदी सहभागी होणार आहेत. सातारकरांनी स्वागत कार्यक्रमास
उपस्तिथ राहून प्रियांकाला शुभेच्छा द्याव्यात.
You must be logged in to post a comment.