पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांची मागणी
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी जीवाचे रान करणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाँग मार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी परिषदेत केली.याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
याबाबत साताऱ्यात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी सहभागी होती. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील प्रचार कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन तसेच रात्रीचा दिवस करून महायुतीस भरघोस मते मिळण्यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सक्रिय होते. महायुतीच्या भरघोस यशामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे योगदान महत्त्वाचे आहे. महायुतीच्या नेते मंडळींनीही हे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सदस्य व लाँगमार्चचे प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदीप कवाडे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात यावे तसेच पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदारीच्या समित्या व महामंडळांवर घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी युवराज कांबळे व सहकारी यांनी केली.
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर येथील सभेला जात असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांना मोठी दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले होते. त्यावेळी कराडच्याच कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले व जखमी अवस्थेत कोल्हापूरला प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी गेले व तेथे मतदारांना महायुतीला मते देण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर या सभेस उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आलेल्या हेलिकॉप्टरने त्यांना मुंबईला पुढील उपचारासाठी नेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विजयासाठी घेतलेले परिश्रम लक्षात घेता त्यांना राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनात मागणी केल्याचेही युवराज कांबळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, खैरलांजी प्रकरणावरून स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देणारे तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा लॉंगमार्च काढणाऱ्या प्रा. जोगेंद्र कवाडे यांना मंत्रिमंडळात संधी देणे म्हणजे आंबेडकरी चळवळीचा गौरव करण्यासारखेच आहे. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी आंबेडकरवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहतील, त्यामुळे महायुतीने तातडीने हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी युवराज कांबळे यांनी केली.
या पत्रकार परिषदेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा महासचिव प्रभाकर साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश किन्हईकर, जिल्हा संघटक संतोष राठोड, सातारा तालुकाध्यक्ष संजय कांबळे, शेखर बनसोडे, अजित कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.