सातारा शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी द्या ;आ. शिवेंद्रसिंहराजेंची ना.फडणवीस यांच्याकडे मागणी

सातारा; (भूमिशिल्प वृत्तसेवा):सातारा शहरातील रस्त्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी सर्व रस्ते काँक्रीटचे करावेत अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. दुर्दैवाने त्यावेळी भाजपचे सरकार आले नाही मात्र, आता भाजपचे सरकार आले असून शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी ७५ कोटी निधी द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नूतन उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे केली असून याबाबत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना ना. फडणवीस यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. 

राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या धर्तीवर सातारा शहरातील रस्ते काँक्रीटचे करावेत अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारादरम्यान फडणवीस यांनी यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र निवडणुकीनंतर दुदैवाने भाजपचे सरकार आले नाही. मात्र आता भाजपचे सरकार आल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ हि मागणी राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे केली आहे. ना. फडणवीस यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.

सातारा पालिका हद्दीत सध्या भुयारी गटर योजनेचे काम सुरु असून शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खुदाई झाली आहे. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील रस्ते वाहतुकीस धोकादायक झाले असून पालिका हद्दीतील सर्वच रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत पायाभूत सोयी- सुविधा अनुदानातून ७५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. यासंदर्भात ना. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

पॉवर हाऊस- महादरे रिंगरोडसाठी निधी

सातारा पालिका हद्दवाढ झालेल्या भागातील सातारा पॉवर हाऊस, महादरे ते जुना मेढा रिंगरोड कामासाठी आणि जमीन संपादनासाठी सातारा पालिकेस ठोक अनुदानातून निधी मिळणे आवश्यक आहे. हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा रस्ता महत्वाचा असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचा सर्व्हे करून या रस्त्यासाठी ठोक अनुदानातून निधी द्यावा, अशीही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून त्यालाही ना. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

error: Content is protected !!