सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीमेचे कराडमध्ये आयोजन करण्यात आले. तसेच सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातून सायकल चालवत भाजप आणि मोदी सरकारच्या धोरणावर हल्ला केला.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडमधील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅलीची सुरुवात केली. ही रॅली पुढे येऊन दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे जाऊन भेदा चौक मार्गे शहरातील पोपटभाई शहा पेट्रोल पंपावर समारोप करण्यात आला.
या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा काँग्रेस कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूर नगरसेवक राजेंद्र यादव, कऱ्हाडचे माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, सतीश पाटील, शिवाजी जाधव, दिलीप देशमुख, मोहन शिंगाडे, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, कऱ्हाड दक्षिण युवकचे अध्यक्ष अमित जाधव, कोळे ग्रामपंचायत सदस्य अभिजित चव्हाण, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे, महागाईच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाईचा डोंगर सामान्य जनतेसमोर उभा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून ज्यादा पैसे सामान्य जनतेकडून उकळत आहे व याचे त्यांना काहीही सोयरसुतक दिसत नाही. आज इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे, यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर सायकल रॅली आयोजित करून निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच स्वाक्षरी मोहीम सुद्धा शहरी भागातील पेट्रोल पंपावर घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचा रोष काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे व या आंदोलनातून आमची मोदी सरकारला मागणी आहे की इंधनाचे दर तातडीने कमी करावेत.
You must be logged in to post a comment.