सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांना त्याचा योग्य मोबदला नव्या दराप्रमाणे देण्यात यावा. पूर्वी करण्यात आलेल्या जमिन संपादनाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्या अगोदर तातडीने सोडवाव्यात. त्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये. संपादित जमिनींत असणाऱ्या उभ्या पिकांचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्याच्या सोडवणूकीसाठी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक पार पडली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.शेखर सिंह, श्री.सारंग पाटील, भूसंपादन अधिकारी श्री.संजय आसवले, रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनिअर श्री.सागर चौधरी, श्री.योगेंद्र सिंह, श्री.जी.श्रीनिवास, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापुरकर, कराडचे प्रांताधिकारी श्री.उत्तमराव दिघे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूसंपादन अधिकारी, मोजणी खात्याचे अधिकारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून प्रथमतः रेल्वेच्या मूळ हद्दी कायम करण्यात याव्यात. त्याच्या पलीकडे लागणाऱ्या जागेचे सरसकट प्रस्ताव शासनाने तयार करावेत. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करून पाईपलाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी. जमिनींचे संपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. त्यांचा सातबारा, गावचा नकाशा, महसूल रेकॉर्ड व रेल्वेचे नकाशे याची खातरजमा करावी.
जिल्हाधिकारी व पुणे रेल्वेचे अधिकारी यांच्या स्तरावरील जे-जे प्रश्न सोडविण्यासारखे आहेत ते तात्काळ सोडविले जावेत. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी धोरणात्मक निर्णयात बदल करावे लागतील अशा मुद्द्यांविषयी सांगितल्यास त्याचा पाठपुरावा मंत्रालय व दिल्ली स्तरावर करण्यात येईल असे आश्वासित केले. त्यातून एकही प्रकल्प बाधित शेतकरी वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी स्पष्ट सूचना यावेळी केली. दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व मागण्या शेतकरी प्रतिनिधी विकास थोरात व अन्य शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या.
You must be logged in to post a comment.