पुसेगावची वार्षिक यात्रा, कार्यक्रम रद्द

संग्रहित

पुसेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प पू श्री सेवागिरी महाराजांचा दि. १२ जानेवारीचा रथोत्सव व त्यानिमित्ताने दहा दिवस भरवण्यात येणारे सर्व  कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात्रा न भरवता प्रशासकीय नियमानुसार यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. 

कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती मठाधिपती सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्ट चेअरमन मोहनराव जाधव यांनी दिली. बुधवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुसेगाव (ता. खटाव) येथे सेवागिरी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी तोडरमल, तलाठी गणेश बोबडे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात श्रीक्षेत्र पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या साजरा करण्यात येणाऱ्या रथोत्सव सोहळ्यास लाखो भाविक पुसेगावात एकाच दिवशी हजेरी लावत असतात. यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता असल्याने पुसेगाव येथे भरणारी पारंपरिक यात्रा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे लाखो भाविकांच्या उपस्थित साजरी होणारी सेवागिरी यात्रा काही नागरिकांच्याच उपस्थितीत अगदी साधेपणाने साजरी होणार आहे.

error: Content is protected !!