सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऐतिहासिक राजवाड्यावर देखरेख आणि दुरुस्ती यांचे कोणतेही थेट नियंत्रण नसल्याने राजवाडा परिसराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा राजवाडा संवर्धनासाठी पुन्हा आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
ऐतिहासिक राजवाड्याची काल (शुक्रवारी) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. या वेळी राजमाता कल्पनाराजे भोसले व मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते. सातारा शहराचा राजवाडा म्हणजे अनेक ऐतिहासिक परंपरांचा साक्षीदार आहे. या राजवाड्यामध्ये झुंबरखाना, खलबतखाना, त्याचबरोबर राज दरबार, मराठा भित्तिचित्रांची आर्ट गॅलरी असे विविध विभाग होते.
गेल्या २० वर्षांपूर्वी राजवाडा इमारतीमध्ये जिल्हा सत्र न्यायालय, नगरपालिका आदी शासकीय कार्यालये भरत होती. सध्या राजवाड्यामध्ये प्रतापसिंह हायस्कूलचे काही वर्ग भरतात. मात्र, राजवाड्याचा पूर्वेकडील भाग बराचसा रिकामा असून, तो बंद आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांची बऱ्याच वर्षांपासून हा राजवाडा आमच्या ताब्यात देण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी आहे. या संदर्भात दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जयवंशी, खासदार उदयनराजे यांनी या राजवाड्याची पाहणी केली. राजवाड्याचा ऐतिहासिक रुबाब कायम ठेवण्यासाठी त्याची तातडीने देखभाल आणि दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्याकरिता हा राजवाडा तत्काळ आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टी बारकाईने तपासून, कायदेशीर बाबी पाहून व त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठवून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
You must be logged in to post a comment.