प्रा. डॉ. शरद गायकवाड यांना ‘संबोधी’चा कॅप्टन पुरस्कार

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी दलित चळवळीचे अभ्यासक, कार्यकर्ते कोल्हापूर येथील महावीर कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरद गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.

प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांचे जन्मदिनी येत्या शनिवारी २६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता प्रा.शरद गायकवाड यांना विलासपूर, छत्तीसगड मधील नवभारत व सेंट्रल क्रोनिकल या अनुक्रमे हिंदी व इंग्रजी दैनिकांचे माजी सहसंपादक ,ज्येष्ठ पत्रकार हिंदी साहित्यिक, तसेच मराठीतील अनेक प्रसिद्ध ग्रंथांचे अनुवादक किशोर दिवसे (पुणे) यांच्या हस्ते नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
तेराव्या पुरस्काराचे मानकरी प्रा. शरद गायकवाड हे सातारा तालुक्यातील अंगापूर गावचे सुपूत्र आहे. त्यांचे अलिकडेच प्रकाशित झालेले ‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे पुस्तक बहुचर्चित आहे.
प्रा. गायकवाड सत्यशोधक अण्णा भाऊ साठे अकादमीचे संस्थापक, अध्यक्ष आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ऑक्टोबर २०१९ मध्ये रशियातील मॉस्को शहरात पुश्किन विद्यापीठात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे. थायलंड देशातील बँकॉक येथे पार पडलेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार जागतिक साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
समताधिष्ठीत समाज प्रस्थापनेसाठी त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन जागरसाठी महाराष्ट्र, गोवा, आंध्र, कर्नाटक आदी राज्यात फिरून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांनी स्वतःच्या पोतराज परंपरेला तिलांजली देऊन अनेक पोतराजांचेही जटा निर्मूलनाचे कार्य केले असून पोतराज प्रथा व जटा निर्मूलन राज्य परिषदेचेही आयोजन केले होते. त्यांनी बहुजन समाजावरील अनेक अन्याय अत्याचार प्रकरणां विरुद्धच्या अनेक आंदोलनात सक्रिय भाग घेतला आहे. तसेच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचे अनेक विवाह लावण्यात पुढाकार घेऊन त्यांचे पौरोहित्यही केले आहे.
मातंग समाज : साहित्य आणि संस्कृती, अँट्रासिटी कायदा, अण्णा भाऊंचा भाऊ – शंकर भाऊ साठे, बहुजनवादी साहित्य ( क्रांतीचं कुळ आणि बंडाचे मूळ ) आदी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले असून जागतिकीकारण आणि मराठी साहित्य, जागतिकीकरणाचा अवकाश आणि परिवर्तनाच्या चळवळी या ग्रंथांचे संपादन केले आहे.
पहिले फुले- शाहू- आंबेडकर व मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन, कोल्हापूर व नाशिक येथील दुसरे दलित, भटके विमुक्त, ओबीसी , आदीवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. तसेच आतापर्यंत विविध ठिकाणचे वीस पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे.

कोरोना साथीच्या निर्बंधांमुळे उशिराने येत्या शनिवारी होत असलेल्या या वितरण समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!