सातारा आरटीओ कार्यालयाबाहेरील टपऱ्यांची तोडफोड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील ८ ते १० टपऱ्यांची तोडफोड झाली. मद्यप्राशन करुन १० ते १५ जणांनी ही तोडफोड केली असून यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या दक्षिणेकडील रस्त्याच्या बाजुला अनेक टपऱ्या आहेत. पान टपरी, रसवंती गृह, चायनीज तसेच चहाच्याही टपऱ्या आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांनी मद्याच्या नशेत गोंधळ घालत टपऱ्यांची तोडफोड करण्यास सुरूवात केली.या तोडफोडीत अज्ञतांनी ८ ते १० टपऱ्या उलथवून टाकल्या. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. एका दुकानातून तर ७ हजारांचा माल आणि २४०० रुपयांची रोकडही चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. तर काही टपऱ्यांचे पत्रे उचकटण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा हजारो रुपयांत आहे. तर संबंधितांनी कपडे काढून टपऱ्यांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी टपरीधारक आले असता त्यांना नुकसानीची कल्पना आली. त्यांनी पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.

error: Content is protected !!