सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विटा-सातारा राज्यमार्गावर आज सकाळी रहिमतपूर पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन क्रूझर गाड्या पकडल्या. त्यामधून सदतीस हजार छत्तीस रुपये किमतीच्या गुटख्यासह तब्बल ७ लाख ३७ हजार ३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.वाहन चालक बुड्डेसाहब नबीलाल मंदेवाली (वय २८), वाहन मालक कासीमसाहब यतुमनसाहब मंदेवाली (वय ४५) व वाहन चालक बंदिगीसाहब इनामसाहेब मंदेवाली (वय ३१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रहिमतपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड यांना विटा – सातारा या राज्य मार्गावरून वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली हाेती. त्यानुसार शनिवार, दि.२७ राेजी बसस्थानक येथील शिवराज चौकामध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास (केए २९ एन २८९९) व (केए ४८ एम ६६१२) या दोन संशयास्पद क्रूझर गाड्या एकापाठोपाठ एक आलेल्या दिसताच पोलिसांनी दोन्ही गाड्या अडवल्या आणि तपासणी केली.
एका गाडीमध्ये आरएमडी पानमसालाचे दोन कागदी बॉक्स, एम सेंटेड तंबाखू गोल्डचे दोन बॉक्स, विमल पान मसाला तपकिरी बावन्न पाकीट, व्हि वन तंबाखू तपकिरीचे बावन्न पाकीट, व्हि वन सेंटेड तंबाखू निळाचे बावन्न पाकीट असा पंधरा हजार चाळीस रूपयांचा गुटख्याचा साठा सापडला. तर दुसर्या गाडीमध्ये विमल पान मसाला निळाचे एकशे छप्पन्न पाकीट, व्हि वन सेंटेड तंबाखू तपकिरीचे बावन्न पाकीट, व्हि वन सेंटेड तंबाखू निळ्याचे बावन्न पाकीट असा तब्बल एकवीस हजार नऊशे शहाण्णव रुपयांचा गुटखा सापडला.
प्रतिबंधित अन्नसाठा व वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तसेच दोन्ही गाड्या जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आल्या आहेत. गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, सहाय्यक फौजदार विष्णू कुडे, पोलिस नाईक गणेश कदम, पोलिस कॉन्स्टेबल सागर भुजबळ, होमगार्ड आकाश कदम, सागर धोतरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता.