सातारा, (भूमिशिल्प) : सातारा शहरासह फलटण, कोरेगावसह जिल्ह्यात पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला.
मागील काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. सकाळीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. फलटण परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. ग्रामीण भागात जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तालुक्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. साडे पाचच्या सुमारासच मोठा काळोख पसरला होता. बऱ्याच कालावधीनंतर गारांचा पाऊस आल्याने गारा गोळा करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली.दोन तासाहून अधिकवेळ पाऊस सुरू होता गारपिटीमुळे भाजीपाला, टोमॅटो, कांदा, आंबा, मका या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक रस्ते जलमय होऊन वाहत होते अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळिशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता.अचानक आलेल्या दमदार पावसाच्या हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
You must be logged in to post a comment.