सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असून, शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला, तर रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ३८ तर नवजाला ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पीक काढणी आणि मळणीच्या कामात व्यत्यय येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची कसरत होत आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून तुरळक स्वरूपात पाऊस होत होता. पश्चिम भागातील कास, नवजा, कोयना, बामणोली, महाबळेश्वर परिसरात अत्यल्प पाऊस झाला, तर पूर्व भागात काही ठिकाणी चांगली हजेरी लावली. मात्र, या पावसात जोर नव्हता. पूर्व भागातील लोकांच्या नजरा परतीच्या पावसाकडे होत्या. यावर रब्बी हंगामाची मदार असते.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. पूर्व, तसेच पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. शनिवारी दुपारपासून तर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसास सुरुवात झाली. माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांसह पश्चिमेकडील कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यांतही हजेरी लावली. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता.परतीचा पाऊस होत असल्याने पीक काढणीत व्यत्यय येत आहे, तर काही ठिकाणी मळणी सुरू झाली आहे. पावसाच्या भीतीमुळे शेतकरी काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत. आगामी काही दिवस पाऊस आणखी पडणार आहे.
You must be logged in to post a comment.