पावसाची दमदार हजेरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहरासह तालुक्याच्या काही भागांत गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दीपावलीच्या उत्साहावर विरजण पडले. लक्ष्मीपूजन सुरू असतानाच पावसाच्या सरी कोसळू लागल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. तसेच किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले.

दीपावलीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजनामुळे दिवसभर बाजारपेठेत मोठी गर्दी होती. सायंकाळीही याच गर्दीत विक्रेते, व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजनाच्या तयारीला सुरुवात केली. दुकानांसमोर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. तसेच लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यासही बालचमू आतूर होते. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यानजीक किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली.

काहीजणांचे साहित्य भिजून नुकसान झाले. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फटाके स्टॉल लावण्यात आले आहेत. त्या फटाके विक्रेत्यांचीही ऐनवेळी आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. कऱ्हाड शहरासह तालुक्याच्या काही भागांत हा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

error: Content is protected !!