दोन राजेंमध्ये व्यावहारिक तोडगा काढणार : चंद्रकांत पाटील

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): ‘सगळीच माणसे गळ्यात गळे घालून चालतील असं होत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्ये वाद नाहीत. तसेच त्याचा पक्षालाही तोटा होणार नाही. मात्र, जे प्रश्न असतील ते देवेंद्रजी आणि मी दोन्ही राजेंसोबत बसून चर्चेद्वारे सोडवू. दोघांमध्ये व्यावहारिक तोडगा काढला जाईल,’ असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती बँक, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी साताऱ्यात आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ॲड. भरत पाटील, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, अमित कुलकर्णी, शहराध्यक्ष विकास गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. सातारा शहरामध्ये दोन राजेंमध्ये वाद आहे, तसा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे, याबाबत पक्ष काय निर्णय घेणार? या प्रश्नावर पाटील म्हणाले की, ‘घर म्हटलं की भांड्याला भांडं लागत असतं म्हणून काही घर मागे राहत नाही. दोन राजेंमध्ये वाद वगैरे नाहीत. जे असेल ते सोडवले जाईल. याचा पक्षाला काहीही तोटा होणार नाही. देवेंद्रजींशी बोलून योग्य तोडगा काढला जाईल.’

पाटील पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदन प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना क्लिन चीट मिळाली, असे समजते. मात्र, दुसऱ्या बाजूला भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता बेहिशेबी असल्यानेच कारवाई करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसारच कारवाई सुरू आहे.’

पृथ्वीराज बाबा यांनी ईडीची किंमत राहिली नसल्याचे म्हटले होते. त्यावर पाटील म्हणाले की, ‘आपल्या देशात लहान मुलगा सुध्दा काहीही बोलू शकतो. मग बाबा हे बाबा आहेत. बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तिथे ईव्हीएम मशीन योग्य असल्याचे ते सांगतात. मात्र, आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम वाईट असल्याचा नेमका उलटा आरोप केला जातो. ईडी, एनआयई, सीबीआय यांना त्यांचे काम करू द्या.’

error: Content is protected !!