दस्तुरखुद्द राजे हो, आता तुम्हीच पालिकेत लक्ष घाला..!

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेतील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात  पालिकेच्या कारभाराविषयी उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या गादीचा वारसा सांगणार्‍या या स्वराज्याच्या राजधानीत आणि विशेषत: सातार्‍याची मातृसंस्था असलेल्या पालिकेतच हे असले प्रकार घडत असतील तर जनतेने कुणाच्या तोंडाकडे पाहायचे आणि विकासकामांकरिता दाद तरी कुणाकडे मागायची? भविष्यात पालिकेमध्ये भ्रष्टाचार, लाचखोरी असे दुर्दैवी प्रकार करण्याची पुन्हा कुणाचीही हिंमत होणार नाही असा वचक निर्माण करून सातारच्या दोन्ही राजांनी पालिका कारभारात प्रत्यक्ष लक्ष घालावे, अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.
सोमवारी सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना 2 लाख 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली. याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोग्य निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.संचित धुमाळ याने संबंधित तक्रारदाराकडे सातारा नगर परिषदेकडील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील 15 लाखांची डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख 30 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पालिका कार्यालयात सापळा रचला आणि संचित धुमाळ उपरोक्त रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला.
पालिका लाच प्रकरणाची शहरभर चर्चा
सातारा पालिकेच्या एका बड्या अधिकार्‍याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली आणि पालिका प्रशासन व तिच्या एकूणच कारभाराविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले. प्रशासन तसेच अधिकारी वर्गावर कुणाचाच वचक नसल्याने पालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालल्याची चर्चा झडू लागली. काल अचानक लाच प्रकरण उजेडात आल्याने दैनंदिन कामकाजास आलेला कर्मचारी, अधिकारी वर्ग वगळता आज मंगळवारी पालिका कार्यालयात फारसे कुणी फिरकताना पाहायला मिळाले नाही.
दोन्ही राजे असताना अशी घटना घडणे निंदनीय
मागील पालिका निवडणुकीत दोन्ही राजेंनी आपल्या आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणुका लढवल्या. यावेळी भाजपानेही निवडणुकीत सहभाग नोंदवत मुसंडी मारली. मात्र सातारा विकास आघाडीला बहुमत मिळाल्याने साविआने नगराध्यक्ष पदासह एकहाती सत्ता मिळवली. दरम्यान, सातारा विकास आघाडीची एकहाती जरी सत्ता असली तरी काही दिवसांपूर्वी दोन्ही राजे भाजपामध्ये गेल्याने पालिकेत दोन्ही राजेंची सत्ता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पालिकेत सध्या सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक, नगरविकास आघाडीचे 12 तर भाजपाचे 6 असे बलाबल आहे.एकूणच सातारा पालिकेत दोन्ही राजेंची सत्ता असताना लाचखोरीसारखी घटना घडणे ही निंदनीय बाब म्हणावी लागेल पण शहराच्या विकासाच्या दृष्टीने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनीही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
पालिकेचा आरोग्य विभाग सक्षम : नगराध्यक्षा
लाच प्रकरणामुळे पालिका आरोग्य विभागातील काही लोक कमी झाले असले तरी त्यांच्या जागी तात्काळ दुसरे कर्मचारी नियुक्त करून येत्या दोन-तीन दिवसांत आरोग्य विभागाचे काम पूर्ववत होईल. नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सक्षम असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ’भूमिशिल्प’शी बोलताना सांगितले.
पालिकेत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही : धनंजय जांभळे
सातारा पालिका ही शहराची मुख्यसंस्था आहे. या ठिकाणी धोरणात्मक निर्णय होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचं काम होत असते. सोमवारी घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय असून पालिकेची बदनामी करणारी आहे. इथे कुंपणच शेत खात असल्याने यापुढे पालिकेत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असल्याचे भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी ’भूमिशिल्प’शी बोलताना सांगितले.

एक आंबा नासका निघाला म्हणून काय…
’एक आंबा नासका निघाला म्हणून काय आपण बाकीचे आंबे फेकून देत नाही. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या अधिकारी- कर्मचार्‍याने केलेल्या कुकर्माची शिक्षा आपण इतर अधिकारी-कर्मचारी वर्गास देऊ शकत नाही. पालिकेत काल घडलेल्या लाच प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण कुणा निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाही याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा माधवी कदम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. 
धुमाळसह तिघांना पोलीस कोठडी, एक पसार
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संचित धुमाळसह गणेश टोपे वप्रवीण यादव या तिघांना आज विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे पसार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपासी अधिकारी तसेच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.
पालिकेच्या इतिहासाला काळिमा : अमोल मोहिते
सातारा पालिकेत घडलेले लाच प्रकरण म्हणजे पालिकेच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा फासणारी घटना असून मी त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली. सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच ही लाचखोरी घडली असून सातारकरांच्या हितासाठी भविष्यात पालिका प्रशासनावर सत्ताधार्‍यांनी अंकुश ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
सॉरी… नो कंमेंट प्लिज : मुख्याधिकारी
’पालिका लाच प्रकरणासंदर्भात प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण काय कारवाई करणार आहात,’ या ’भूमिशिल्प’ ने विचारलेल्या प्रश्नावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी भाष्य करणे टाळले आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने मी त्याविषयी आता बोलू शकत नाही, ’सॉरी… नो कंमेंट प्लिज’, असं म्हणत मूळ प्रश्नालाच बगल दिली.
पालिकेत घडलेल्या प्रकरणाकडे पाहाता मोकाट प्रशासनावर अंकुश आणि वचक ठेवणे अत्यावश्यक झाले असून सातारच्या दोन्ही राजांनी आता याकडे स्वतः लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सातारा पालिकेला लागलेला हा कलंक लवकरात लवकर पुसला जाऊन पालिकेच्या आजपर्यंतच्या चांगल्या कामकाजाला साजेसा असा कारभार पुन्हा सातारकरांना पाहायला मिळावा हीच दोन्ही राजांकडून माफक अपेक्षा.


error: Content is protected !!