राजे… खाऊन मरण्यासाठी आधी खायला तर मिळू द्या !


प्रति,
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

अवघ्या जनतेचं हृदयस्थान असलेल्या
माननीय उदयनराजेंना मानाचा मुजरा !


महाराज महोदय,
“मृत्यू कुणाच्याही हातात नाही. जो मरणार तो मरणार आणि जो जगणार तो जगणार. प्रत्येक मृत्यू हा कोरोनामुळंच होतो, असं नाही. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंच आहे. एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला मरण नसतं,” अशी प्रतिक्रिया काल-परवा आपण प्रसारमाध्यमांसमोर दिली होती. इतकंच नव्हे तर कोरोना कशातून होतो, असं विचारल्यावर “कुणी म्हणतं चिकनमधून, कुणी म्हणतं मटणामधून तर कुणी म्हणतं भाज्यांमधून; मग खायचं तरी काय ? त्यापेक्षा खाऊन मरा,” अशी मिश्किल टिप्पणीही आपण केली होती. 
राजे, “…त्यापेक्षा खाऊन मरा,” ही आपण केलेली टिप्पणी जरी मिश्किल असली तरी आम्हा जनतेसाठी ती मुश्किल आहे हो ! कारण खाऊन मरण्यासाठी आमच्याकडं काही खायला तरी असायला हवं ना? चिकन, मटण तर सोडा; दोन वेळच्या जेवणाकरिता लागणारा पुरेसा भाजीपाला देखील विकत घेणं आज अवघड झालंय हो ! 
जो जन्माला आला तो आज ना उद्या मरणार हे आपलं म्हणणं अगदी  रास्त आहे. मरणासाठी कोरोनाच व्हायला पाहिजे, असंही काही नाही पण उपाशीपोटी मरण्यापेक्षा खाऊन मरणं चांगलं, असं जे आपण म्हटलात ते  खाऊन-पिऊन मरण्याचं सुख तरी आमच्या वाट्याला कुठं आहे हो ?
लॉकडाऊनपूर्वीचं जीणं आणि आताचं जगणं  यातला फरक दर्शवणारं एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक मनुष्य पोटतिडकीनं त्याची कैफियत मांडत होता…‘इतरांची तोंडं गोड करण्यासाठी चॉकलेट-गोळ्यांच्या दोन-चार बरण्या डोक्यावर घेऊन उन्हातान्हात फिरल्यावर कुठं तरी आमच्या मुखात दोन घास पडत होते पण आज कोरोनामुळं धंद्यासाठी घराबाहेर पडता येईना आणि लॉकडाऊनमुळं चॉकलेट-गोळ्यांचा माल मिळता मिळेना. आज संपेल, उद्या संपेल असं करता करता शंभर दिवस घरात बसून काढले पण लॉकडाऊन काही संपला नाही. घरात होता नव्हता तेवढा किराणा मात्र संपला आणि आता तर त्या बरण्यांमधली चॉकलेटं-गोळ्यासुद्धा ! जे विकून घरात चार पैसे येत होते तेच खाऊन दिवस काढावे लागले आणि आता तर ते ही संपलंय. सांगा ना तुम्ही, आता आम्ही जगायचं तरी कसं ?’

राजे, लॉकडाऊन काळात दोन वेळचं खाणं मिळणं देखील मुश्किल होऊन बसलेल्यांच्या कैक हृदयद्रावक कहाण्या इथं सांगता येतील हो… असो, आपण जाणते आहात, दिलदार आहात, जनतेची दुःखं समजून घेऊन ती दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहात. लॉकडाऊन काळात उदयनराजे मित्र समूह आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी सातारकरांना सढळहस्ते मदत केली आहे हे ही जनता जाणून आहे. पण ही झाली आपण केलेली वैयक्तिक मदत; शासनाकडून मिळणार्‍या मदतीचं काय ? जिल्ह्यातील गरजू आणि गोरगरीब जनतेची संख्या पाहाता त्यांच्या गरजा भागवणारी पुरेशी रसद अजूनही त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये. ही रसद मधल्या मधेच अडून राहातेय की अधेमधे तिच्यावर कुणी तरी ’ताव’ मारतंय, हे काही कळायला मार्ग नाही. कोरोनाचं वाढतं भय, पोट कसं भरायचं याची काळजी आणि पुढं कसं होणार याची चिंता या गोष्टींनी आज सारी जनता बेहाल झालीये.
राजे, म्हणूनच या कोरोनासंकट काळात शासनाकडून राबवल्या जाणार्‍या विविध योजना आम्हा सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोचतील याची खबरदारी आणि जबाबदारी आपण घ्यावी आणि याबाबत जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईची आपण स्वतःहून दखल घ्यावी हीच आमची आमच्या राजाकडे मागणी !


राजे, जनतेची सहनशक्ती संपत चाललीये हो ! आता दस्तुरखुद्द आपण पुढाकार घ्या आणि या तुमच्या जनतेला पुन्हा सुखा-समाधानानं जगता येईल यासाठी आपलं ‘राजेपण’ अमलात आणा.
आपणास पुन्हा एकवार मानाचा मुजरा !
 

कळावे,
एक सर्वसामान्य सातारकर
                    जय महाराष्ट्र


          


error: Content is protected !!