चाफळमध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तीर्थक्षेत्र चाफळ ता. पाटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.     

गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्या पासून दहा दिवस चाफळच्या श्रीराम  मंदिरात चालणारा श्रीराम नवमी उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. आज पहाटे पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालू असतात मात्र गेल्या वर्षापासून कोरोणाच्या संकटामुळे मंदिरात चार पुजारी यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीरामाचे भजन आरती स्तोत्र पठण कार्यक्रम होऊन साध्या पध्दतीने यात्रा पार पाडली जात आहे. आजही ठिक बारा वाजून पाच मिनिटांनी मंदिराच्या  गाभार्यात मोजक्या भक्तगणांच्या उपस्थित श्रीराम जन्मोत्सवाचा विधि पार पडला.     

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या जागतिक महामारी मुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व त्यामध्ये होणारे उत्सव यात्रा यावर शासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम जन्मोत्सव हा मंदिराच्या गाभाऱ्यात ठराविक वैदिक ब्राह्मण व श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त अनिल साळुंखे ,एल.एस.बाबर, त्याचबरोबर कराडचे डी.एस.पी. डॉ. रणजीत पाटील, उंब्रचे स.पो.नि. अजय गोरड, मानकरी मारुती साळुंखे, मानसिंग साळुंखे व सुहासिनी वैदिक महिला हे या जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित होते.   

श्रीराम जन्म सोहळ्यासाठी फुलांनी सजवलेल्या आकर्षक पाळण्यामध्ये श्रीरामाची मूर्ती वैदिक पूजाअर्चा करून पाच सुवासिनींच्या हस्ते ठेवण्यात आली. त्यानंतर विधीवत श्रीरामाचे जन्म स्तोत्र पठण करून सर्वांनी श्रीरामाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. दशमीला सूर्योदयापूर्वी होणारा रथ उत्सव सोहळा कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे.या दिवशी देखील कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन विश्वस्त अनिल साळुंखे यांनी केले आहे.

error: Content is protected !!