सातारा रोड येथील रामोशी समाजाचा मेळावा उत्साहात
सातारारोड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): केंद्र सरकारने संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख वाटचाल केलेली आहे. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन ते निघाले आहेत. रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी देखील भविष्यात मोठे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.
सातारारोड येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित केलेल्या रामोशी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे होते. याप्रसंगी आमदार महेश शिंदे, ॲड.विशाल शिरतोडे, सुधीर बुधावले, गिरीश बुधावले, कपिल चव्हाण, बाळू जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.
खा.उदयनराजे पुढे म्हणाले, मोदी सरकारने महिला, तरुण, वृद्ध, शेतकरी ,खेळाडू यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. भारताचे नाव जगभर गौरविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामोशी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीही भविष्यात कुठेही कमी पडणार नाही. तरुणांच्या प्रगतीकरता आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता मी प्रयत्न करेन, असा शब्द त्यांनी दिला.आमदार महेश शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र सभा, मेळावे, गावभेटी सुरू आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघ अत्यंत विस्तृत असा असून सर्व ठिकाणी खासदार उदयनराजेंना पोहोचावे लागते, तरीदेखील रामोशी समाजावरील असलेल्या प्रेमापोटी ते या मेळाव्यासाठी हजर राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच भविष्यात रामोशी समाजाच्या प्रगतीसाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन देखील आ.महेश शिंदे यांनी दिले.
You must be logged in to post a comment.