सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील इयत्ता ९ वीच्या वर्गात अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातल्या मुलांनी वारंवार बलात्कार केला. दरम्यान, ही मुलगी गर्भवती असल्याचीही खळबळजनक माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीने मेढा पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गात शिकत असलेली दोन मुले शेतातल्या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. घरात कोणी नसताना चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील करण्यात आले. मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे. यामुळे भीतीच्या छायेखाली असल्याने तिने याबाबत कुणालाही सांगितले नाही.मात्र, यानंतर तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांना ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या दोन मुलांच्या विरोधात सर्व हाकिकत पीडितांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, संबंधित दोघांना तत्काळ ताब्यात घेऊन त्याना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मेढा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने ,सहकारी इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख आदी करत आहेत.
You must be logged in to post a comment.