उमेदवार उमेश चव्हाण यांच्या प्रचार तंत्राचा भल्याभल्यांनी घेतला धसका
कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेश चव्हाण यांच्या घर टू घर प्रचार तंत्राचा भल्याभल्यांनी घेतला धसका घेतला आहे. त्यामुळे “रासपची शिट्टी कोरेगावात करणार मात्तबरांची विट्टी गुल” अशी प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त होत आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. येथे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे व महायुती तर्फे शिवसेनेचे महेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत कांबळे हे निवडणुकीत उतरले आहेत. मात्र त्यापेक्षाही आपले वेगळेपण जपत, समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचलेले उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेशभाऊ चव्हाण यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे. घर टू घर आणि वाडी वस्तीवर सुद्धा प्रचार करून उमेदवारीमागची आपली भूमिका पटवून देणारे उमेश भाऊ कोणत्या प्रस्थापितांची शिट्टी वाजवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
उमेश चव्हाण हे गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महागाईविरोधात काढलेला मोर्चा, पारधी,ओबीसींच्या मागण्यांबाबत केलेले आंदोलन, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सरकारला धारेवर धरण्याचे केलेले काम तसेच महिला सन्मान मेळावा, घरकुल योजनेसाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा आणि विविध सामाजिक प्रश्नासाठी त्यांनी उभारलेला लढा अनेकांच्या कौतुकाचा विषय आहे. या तळमळीच्या कार्यकर्त्याबद्दल सर्वांनाच आदर वाटतो.
लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक लढवणे हा प्रत्येकाला संविधानाने दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे. परंतु आतापर्यंत प्रस्थापितांनी गरीब मराठा, धनगर, रामोशी, बौद्ध, मातंग, फिरस्ते पारधी, डवरी, गोपाळ, वडार, बेलदार, कैकाडी व भटक्या समाजाचा वापर हा फक्त मतदानासाठी केला गेला आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम प्रस्थापित राजकीय पक्षांचे नेतेमंडळींनी इमाने- इतबारे करून दाखवलेले आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कोरेगावच्या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे.
श्री. उमेश चव्हाण यांना विस्थापित व गावकुसाबाहेरील किमान ६० हजार मतदारांची मते मिळतील अशी खात्री समाजातील अभ्यासू घटकांतून व्यक्त होत आहे. ही निवडणूक एकीकडे प्रस्थापित धनदांगड्याचे धनशक्ती प्रदर्शन आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. सध्या डॉ. रमाकांत साठे, शरद साबळे, मोहन साळुंखे, प्रतिक मसणे, रीना भोसले, अमोल पाटोळे, श्रीरंग बोतालजी, किसन कांबळे, श्रीकांत मदने, संजय बोडरे, भरत जगताप, प्रशांत कोळी यांच्यासह उमेश चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते स्वखर्चाने त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रचार करत आहेत.
कोरेगाव,खटाव व सातारा तालुक्यातील मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये नियोजनबद्धरित्या प्रचार करत उमेश चव्हाण यांचे मित्रपरिवार पोहोचलेले आहेत. त्यांचे चिन्ह शिट्टी असून ही शिट्टी प्रस्थापितांना पराभूत करून आपलं हे पूर्ण करतील असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महादेवराव जानकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केला आहे.
You must be logged in to post a comment.